‘वंदे मातरम्‌’साठी शिवसेना आग्रही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

नाशिक - तमिळनाडू, मुंबईमध्ये परवानगी मिळाल्यानंतर नाशिकमध्येही महापालिका शाळांमध्ये ‘वंदे मातरम्‌’ म्हणण्याचा आग्रह धरला जात असून, शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी तसा प्रस्ताव महासभेवर सादर केला. ‘वंदे मातरम्‌’साठी आग्रही असलेल्या भारतीय जनता पक्षानेही शिवसेनेला श्रेय जाऊ नये, म्हणून तयारी केली असून, शिवसेनेऐवजी भाजपच्याच नगरसेवकांच्या प्रस्तावाच्या माध्यमातून ‘वंदे मातरम्‌’ला परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या महिन्यात तमिळनाडूमध्ये ‘वंदे मातरम्‌’ म्हणण्यास मद्रास उच्च न्यायालयाने परवानगी दिली. मुंबई महापालिकेतही परवानगी मिळाल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी येत्या महासभेवर शहरातील शाळांमध्ये दोनदा ‘वंदे मातरम्‌’ म्हटले जावे, यासाठीचा प्रस्ताव दिला आहे. प्रत्येक शाळेत रोज शाळा भरताना व सुटताना ‘वंदे मातरम्‌’ गायन सक्तीचे करावे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, भगतसिंग, राजगुरू, तसेच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या कार्याची माहिती होण्यासाठी प्रत्येक शाळेत रोज एक तास घ्यावा, असा प्रस्ताव आहे. १९ ऑगस्टला होणाऱ्या महासभेत प्रस्ताव ठेवला आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये दर महिन्यातून एकदा तासिका घ्यावी, त्यासाठी माहितीपुस्तिका वाटप करण्याची तयारी नगरसेविका गामणे यांनी दाखविली आहे.

भाजपकडून प्रस्तावाची तयारी
कायदेशीर मार्ग मोकळा झाल्याने राज्यात प्रथम शिवसेनेने मुंबईत ‘वंदे मातरम्‌’ बंधनकारक केले. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेकडून पहिला प्रस्ताव आल्याने त्याचे श्रेय शिवसेनेला जाऊ नये म्हणून भाजपच्या नगरसेवकांमार्फत प्रस्ताव ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यासाठी पक्षाच्या बैठकीत हा मुद्दा चर्चिला जाणार आहे.

छत्रपती सेनेतर्फे मागणी
नाशिक महापालिकेनेही वंदे मातरम्‌ गीत शाळांत बंधनकारक करावे, अशी मागणी छत्रपती सेनेतर्फे आज महापौर रंजना भानसी यांच्याकडे करण्यात आली.महापौरांना आज रामायण या निवासस्थानी निवेदन देण्यात आले. शहरातील सर्व जातिधर्माच्या लोकांचा एकोपा वाढण्यासाठी प्राथमिक शिक्षणापासूनच वंदे मातरम्‌ गीतही बंधनकारक असावे, अशी मागणी छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष चेतन शेलार, नीलेश शेलार, राजेश पवार, सागर धोंगडे, सागर पवार, मुकेश पाटील, मंगेश धोंगडे, कालिम मुलानी, दिगंबर पवार, बंटी धोंगडे, ऋतुजा काकडे, पूजा खरे आदींनी केली. महापौर भानसी यांनी याबाबत सकारात्मक विचार करणार असल्याचे सांगितले.

Web Title: nashik news Shivsena insistence for 'Vande Mataram'