स्‍वप्नाळू युवक-युवतींना यशस्वी उद्योजकतेचा वस्‍तुपाठ

श्रीकृष्‍ण कुलकर्णी
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

स्वप्न, आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक. ते पाहणंही काही वाईट नाही. मोठी स्वप्न प्रत्येकांनीच पाहिली पाहिजे. ते पाहणंही गैर नाही. मात्र ती स्वप्न साकार करण्यासाठी धडपड, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे. नवउद्योजक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या पद्धतीचे शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींना आज ‘सकाळ’, ‘सिमॅसिस-यिन डेव्हलपमेंट प्रोग्राम’द्वारे मार्गदर्शन करण्यात आले. युवक-युवतींच्या आशाळभूत नजर अन्‌ वक्‍त्यांचा हलकाफुलका विनोद आणि त्यांनी मांडलेल्या नामवंतांच्या यशोगाथेद्वारे युवकांनाही एकप्रकारे उभारी, प्रोत्साहनच मिळाले.

स्वप्न, आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक. ते पाहणंही काही वाईट नाही. मोठी स्वप्न प्रत्येकांनीच पाहिली पाहिजे. ते पाहणंही गैर नाही. मात्र ती स्वप्न साकार करण्यासाठी धडपड, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे. नवउद्योजक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या पद्धतीचे शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींना आज ‘सकाळ’, ‘सिमॅसिस-यिन डेव्हलपमेंट प्रोग्राम’द्वारे मार्गदर्शन करण्यात आले. युवक-युवतींच्या आशाळभूत नजर अन्‌ वक्‍त्यांचा हलकाफुलका विनोद आणि त्यांनी मांडलेल्या नामवंतांच्या यशोगाथेद्वारे युवकांनाही एकप्रकारे उभारी, प्रोत्साहनच मिळाले. भरगच्च भरलेल्या सभागृहात वक्‍त्यांना ‘एस, एससर’द्वारे मिळणारा प्रतिसाद आणि उभे राहून टाळ्यांच्या रूपाने दिलेली दाद हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये ठरले.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहाचा परिसर आज दुपारी साडेतीन- चारपासून युवक- युवतींच्या गर्दीने फुलला होता. महाविद्यालयीन युवक म्हणजे आपल्या शिक्षणव्यवस्थेपासून, तसेच कुटुंब, समाजव्यवस्थेपासून भरकटलेले असेच समाजातील काहीजण मानतात. पण त्यांचा हा दृष्टिकोन आजच्या गर्दीने फोल ठरविला, असेच म्हणता येईल. या अनोख्या संवादात्मक कार्यक्रमांतून युवकांना वक्‍त्यांद्वारे उद्योजकता विकासाच्या भरभरून टिप्स आणि व्यवसाय, उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.

‘यिन’चे पुणे विभागाचे प्रमुख कुणाल क्षीरसागर यांनी गुगल, ॲपल, फ्लिपकार्ट, बीव्हीजी ग्रुपच्या यशामागील रहस्य सांगत गुगलचे सीईओ सुंदर पिचई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला, पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नुयी यांची उदाहरणे दिली. ही सर्व व्यक्तिमत्त्व आपापल्या क्षेत्रात येणारे संकट, चढउतारांवर मात करत कशा पद्धतीने पुढे पुढे जात आहे, हे पटवून दिले.
आपल्याला नवा उद्योग, व्यवसाय उभारायचा आहे याचा मनाशी अगोदर निश्‍चय करून त्यासंदर्भात योग्य प्रशिक्षण आपण घ्यायला पाहिजे, असे नमूद करून क्षीरसागर यांनी काही गुपिते सांगितली. बीव्हीजी समूहाने साफसफाईच्या कामात कशा पद्धतीने आपला जम बसविला आहे व जवळपास ७० हजारांहून अधिक लोकांचे पोट त्यावर चालत असल्याचे सांगितले. मी इतरांकडे नोकरी (जॉब) मागण्यापेक्षा इतरांना नोकरीची संधी कशी प्राप्त करून देईल, याकडे लक्ष द्यायला हवे, असेही सांगायला ते विसरले नाही. 

फेसबुक, फेसबुक लाईव्ह, ट्‌विटर, व्हॉट्‌सॲपसारखा सोशल मीडिया म्हणजे आजच्या युवा पिढीचा जीव की प्राणच बनला आहे. ही चांगली बाब आहे. काळानुरूप प्रत्येकाने बदललेच पाहिजे. त्याला युवा पिढीही अपवाद नाही. मात्र या सोशल मीडिया, इंटरनेटचा वापर आपण आपल्या चांगल्या कामासाठी केला पाहिजे. ‘लेट्‌स बी द चेंज, द्‌याट वुई विश टू सी’ असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं. याची आठवण करून देत ते म्हणाले, की संधी ही प्रत्येकाला मिळते; पण या संधीचे सोनं करणं हे आपल्या हातात असते. त्यामुळे येणाऱ्या कुठल्याही संकट, समस्यांना न डगमगता युवा पिढीने त्यावर मात करत व्यवसाय, उद्योजकात यशस्वी होण्यासाठी त्याची निवड केली पाहिजे. 

‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनीही युवकांशी संवाद साधला. या वेळी ‘यिन’चे मुख्य व्यवस्‍थापक  गुजराथी, पुणे विभागाचे श्‍याम माडीवार, ‘यिन’चे मेन्टार डॉ. राम गुडगिला उपस्थित होते.

सेल्फी, ग्रुप फोटो आणि संवादही
सध्याच्या काळातील नावाजलेल्या व्यक्तिमत्त्वाची उदाहरणे देत युवकांची मने जिंकणाऱ्या कुणाल क्षीरसागर यांच्या संवादाला युवा पिढीने चांगलीच दाद दिली. एवढेच नव्हे, तर त्यांच्या संवादानंतर नाट्यगृह परिसरात ग्रुपने सेल्फी, ग्रुफ फोटो त्यांच्याबरोबर काढण्यात, स्वाक्षरी घेण्यात आणि आपल्याला असलेल्या अडचणी मांडण्यात युवा पिढीचा उत्साह दिसून आला. कुणालही उत्साहाने या सर्वांबरोबर फोटो काढणे, स्वाक्षरी देणे आणि संवाद साधण्यात व्यस्त दिसले.

Web Title: nashik news simaces-yin leadership development program