चालक-वाहकाच्या समयसूचकतेमुळे वाचले आजोबांचे प्राण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

येवला - देव माणसातही असतो आणि माणसे आजही माणुसकीची मूल्ये जपून आहेत. याचा प्रत्यय अनेक घटनांतून येतोच. असाच काहीसा अनुभव काल येथे पुन्हा आला. बसमधून प्रवास करताना आजोबांना अर्धांगवायूचा झटका आला. हा प्रकार कळताच बसचालक व वाहकाने समयसूचकता दाखवून बस माघारी फिरवत त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिल्याने आजोबांचे प्राण वाचले. 

काल सकाळी दहाच्या सुमारस नाशिक-औरंगाबाद बस (एमएच 06, एस 8440) येथील स्थानकातून औरंगाबादच्या दिशेने निघाली. साधारणतः आठ ते दहा मिनिटांनंतर अंदरसूलच्या जवळपास बसमधील प्रवासी रामनारायण जयस्वाल (वय 60, रा. नाशिक) यांना अचानक त्रास सुरू होऊन अर्धांगवायूचा झटका आल्याचे त्यांच्या शेजारी बसलेल्या सहप्रवाशांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब वाहक कोकणे यांच्या, तर वाहकाने चालक शेख यांच्या हा प्रकार निदर्शनास आणून दिला. हे कळताच नियम महत्त्वाचे नाहीत तर माणुसकीचे नियम महत्त्वाचे असे मानून वाहक व चालकाने तत्काळ रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला व लागलीच बस वळवून काही मिनिटांत पुन्हा मागे येत येवला येथील ग्रामीण रुग्णालयात आणली. तेथे जयस्वाल यांना दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. वेळेत उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले. येथील महसूल कर्मचारी पुष्कराज केवारे यांना माहिती मिळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जयस्वाल यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत त्यांना घटनेची माहिती दिली. जयस्वाल यांच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना ग्रामीण रुग्णालयातून शहरातील डॉ. शहा खासगी रुग्णालयात पुढील उपचारार्थ हलविण्यात आले. वाहक व चालकाने समसूचकता दाखवून माणुसकीचे जे दर्शन घडविले त्याबद्दल प्रवासी व उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. 

Web Title: nashik news st bus