नगरसेविका गायकवाडांकडून ऑफ स्ट्रिट पार्किंगचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

नाशिक - शहरात वाहनांची संख्या वाढत असताना पार्किंगचा प्रश्‍नदेखील गंभीर झाला आहे. नाशिक रोड भागातील नगरसेविका संगीता गायकवाड यांनी महासभेत ‘ऑफ स्ट्रिट’ पार्किंगचा प्रस्ताव दिला असून, दुबईच्या धर्तीवर पार्किंग यंत्रणा राबविल्यास वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच सौंदर्यात भर पडणार आहे.

नाशिक - शहरात वाहनांची संख्या वाढत असताना पार्किंगचा प्रश्‍नदेखील गंभीर झाला आहे. नाशिक रोड भागातील नगरसेविका संगीता गायकवाड यांनी महासभेत ‘ऑफ स्ट्रिट’ पार्किंगचा प्रस्ताव दिला असून, दुबईच्या धर्तीवर पार्किंग यंत्रणा राबविल्यास वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच सौंदर्यात भर पडणार आहे.

शहर व जिल्ह्यात आजमितीला सव्वासात लाखांहून अधिक वाहने आहेत. लोकसंख्येचा विचार करता घरटी एक दुचाकी व दर चार घरांत एक चारचाकी आहे. यात शहरात सर्वाधिक वाहने धावतात. वाहने वाढत असली तरी रस्ते मात्र तेवढेच आहेत. शहरामध्ये रस्ते रुंदीकरणाला मर्यादा असल्याने पार्किंगचा प्रश्‍न बिकट होत असून, हाणामारीचे प्रकारही होत आहेत. पार्किंगला जागा नसल्याने महापालिकेने रोटेट पार्किंगचा पर्याय स्वीकारला होता; परंतु त्यास प्रतिसाद न मिळाल्याने आता पझल पार्किंगचा पर्याय समोर आला आहे. त्यासाठी लवकरच निविदाप्रक्रिया राबविली जाणार आहे. नगरसेविका संगीता गायकवाड यांनी ऑफ स्ट्रिट पार्किंगचा पर्याय प्रशासनाला दिला. मोठ्या रस्त्यांवरील व्यावसायिक इमारतींसमोरील जागेवर महापालिकेचा हक्क असतो. भविष्यात रस्ता रुंदीकरणाची वेळ आल्यास ती जागा ताब्यात घेण्याचा अधिकार महापालिकेला आहे. सध्या या जागांवर ओटे बांधणे, शेड टाकणे, किरकोळ व्यवसाय करण्याचे प्रकार होतात. पण महापालिकेला पार्किंगसाठी जागेची निकड भासत असल्याने व्यावसायिक इमारतींसमोरील प्रत्येकी पंधरा फूट जागा ताब्यात घेतल्यास रस्त्याची रुंदी वाढेल व ताब्यात घेतलेल्या जागेवर ऑफ स्ट्रिट पार्किंगची व्यवस्था होऊ शकेल.

नाशिक रोडला पायलट प्रोजेक्‍ट
नाशिक रोड येथील रेजिमेंटल प्लाझा ते गायकवाड मळा यादरम्यान पायलट प्रोजेक्‍ट राबविला जाणार आहे. त्यासाठी साठ लाखांची तरतूद केल्याचे बांधकाम व्यावसायिक हेमंत गायकवाड यांनी सांगितले. व्यावसायिकांकडून ज्या जागा ताब्यात घेतल्या जातील, त्यातील काही जागा पार्किंगसाठी, तर काही जागांचे सौंदर्यीकरण केले जाईल. महापालिकेतर्फे तेथे एकाच रंगाच्या व प्रकारच्या टाइल्स, पेव्हरब्लॉक बसविण्यात येतील. यातून वाहने लावण्याची सोय होईल.

शहरात पार्किंगसाठी जागा नसल्याने व्यावसायिक आस्थापनांसमोरील जागा ताब्यात घेऊन त्यावर ऑफ स्ट्रिट पार्किंग केल्यास हा प्रश्‍न काही प्रमाणात मिटेल.
- संगीता गायकवाड, नगरसेविका