नाशिक जिल्हा रुग्णालयाला आरोग्यमंत्र्यांची अचानक भेट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नाशिक - महिनाभरापूर्वी जिल्हा रुग्णालयात नवजात बालमृत्यू प्रकरण "सकाळ'ने उजेडात आणल्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रुग्णालयाला अचानक भेट दिली होती. त्यानंतर रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) नव्याने नऊ इन्क्‍युबेटर दाखल झाल्यानंतर डॉ. सावंत यांनी आज जिल्हा रुग्णालयाला पुन्हा अचानक भेट देत "एसएनसीयू' कक्षाची पाहणी केली. 

जिल्हा रुग्णालयातील "एसएनसीयू' कक्षात इन्क्‍युबेटरची संख्या मर्यादित असल्याने एकाच महिन्यात 55 नवजात बालके दगावली होती. "सकाळ'ने इन्क्‍युबेटरचा "कोंडवाडा' या वृत्तमालिकेद्वारे वास्तव उजेडात आल्यानंतर आरोग्य विभागाची धावाधाव झाली होती. डॉ. सावंत यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेत दुसऱ्याच दिवशी (ता. 9 सप्टेंबर) जिल्हा रुग्णालयास भेट देत पाहणी केली होती. त्यानंतर "सकाळ'च्या व्यासपीठावर आढावा बैठक घेऊन महिनाभरात जादा इन्क्‍युबेटर उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार गेल्या 27 सप्टेंबरला सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) नऊ इन्क्‍युबेटर रुग्णालयाला मिळाले. ते तीन ऑक्‍टोबरपासून कार्यान्वितही झाले. 

डॉ. सावंत आज मालेगाव दौऱ्यावर जात असताना जिल्हा रुग्णालयापाशी थांबून कोणालाही माहिती न देता थेट "एसएनसीयू' कक्षात पोचले. तेथे इन्क्‍युबेटर व्यवस्थेची पाहणी करीत कक्षप्रमुख डॉ. पंकज गाजरे यांच्याशी चर्चा केली. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुशील वाकचौरे उपस्थित होते.