नाशिककरच आरोपीच्या पिंजऱ्यात

राजीव गांधी भवन :- बुधवारी महासभेत आरोग्याच्या प्रश्‍नासंबंधीच्या लक्षवेधीवर चर्चा व्हावी, यासाठी तोंडाला मास्क लावून उभे असलेले शिवसेनेचे नगरसेवक.
राजीव गांधी भवन :- बुधवारी महासभेत आरोग्याच्या प्रश्‍नासंबंधीच्या लक्षवेधीवर चर्चा व्हावी, यासाठी तोंडाला मास्क लावून उभे असलेले शिवसेनेचे नगरसेवक.

नाशिक - शहरात स्वाइन फ्लू व डेंगीचा विळखा पडला असताना त्यावर प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी महापालिकेत बहुमत असलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने प्रशासनाला पाठीशी घातले. शिवाय नाशिककरांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत अस्वच्छतेचे पुरावे सादर केले. 

शिवसेनेने मांडलेल्या लक्षवेधीला भाजपने लक्षवेधीनेच उत्तर देण्याची खेळी खेळण्याचा प्रयत्न अंगलट आला. विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडल्याने त्रेधातिरपीट उडाल्याने एकवेळ सभा तहकूब करण्यात आली, तर पाचवेळा सभेत सत्ताधारी व विरोधकांनी गोंधळ घातला. अस्वच्छतेच्या विषयावर सात तास चाललेल्या चर्चेत केवळ भरती करण्यापलीकडे कुठलाच निर्णय झाला नाही. 

दोन महिन्यांपासून शहरात स्वाइन फ्लू व डेंगीचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज महासभेत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी लक्षवेधी सूचना मांडली. रोगराईच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेवकांनी तोंडाला मास्क लावल्याने आक्रमक होणार, हे प्रारंभी स्पष्ट झाले होते. त्यामुळे शिवसेनेला लक्षवेधीचे श्रेय जाऊ नये म्हणून भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी तत्काळ लक्षवेधी मांडली. त्यांचीच लक्षवेधी प्रथम आल्याचे सांगून त्यांना बोलण्याची संधी दिली. सत्ताधारी असल्याने लक्षवेधी मांडल्याने प्रारंभी भाजपचे नगरसेवक प्रशासनावर तुटून पडतील, असे वाटत असताना आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या चुकांवरच पांघरून घालण्याचे प्रकार घडले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा रुग्णांची संख्या कमी असल्याचा दावा श्री. मोरुस्कर यांनी केला. त्यांचीच ‘री’ आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी यांनी ओढली. नागरिक रस्त्यावर अन्न टाकत असल्याने कुत्रे व डुकरांची संख्या वाढली, असे सांगत दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. प्रशासनाला वाचविण्याचे प्रयत्न होत असताना भाजपचे शशिकांत जाधव यांनी विरोधकांवर फोटोसेशनसाठी आटापिटा असल्याचा आरोप केल्यानंतर संतापलेल्या विरोधकांनी निषेध केला. दिलगिरीनंतर सभा पूर्ववत सुरू झाली.

महापौरांच्या सूचना
उघड्यावरील मांसविक्री बंद करा
औषध व धूरफवारणी करा
आउटसोर्सिंगने कर्मचारी भरती करा

विरोधक आक्रमक; सभा तहकूब
अजय बोरस्ते यांनी यंत्रणेवर कारवाईची मागणी केली. महापालिकेपेक्षा पालिका क्षेत्रात रोगराई कमी असल्याचे सांगितले. सुधाकर बडगुजर यांनी मुंबईपेक्षा नाशिकमध्ये अधिक दराने ठेका दिला जात असल्याच्या मुद्द्याला हात घातला. पश्‍चिम प्रभाग समितीच्या सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडून आलेल्या नगरसेवकांना चिमटा काढला.

भाजपची झुल पांघरल्याने ते नाशिककरांची जबाबदारी विसरल्याचे डॉ.पाटील यांनी वक्तव्य केल्याने संतापलेल्या सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. त्या वेळी महापौरांना दहा मिनिटासांठी कामकाज तहकूब करावे लागले.

सुवर्णा मटाले यांनी सिडकोत मृत रुग्णाच्या नातेवाइकांना तेरा दिवसांनी भेट दिल्याचे सांगून वैद्यकीय विभागाचे वाभाडे काढले. सभागृहनेते दिनकर पाटील यांच्यासह स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव, उद्धव निमसे यांनी भाजपच्या बचावाचा प्रयत्न केला.
 

घंटागाडीसह पेस्ट कंट्रोल ठेकेदारावर कारवाई
पेस्ट कंट्रोल व धूरफवारणीबाबत नगरसेवकांच्या तक्रारीवरून महापौर रंजना भानसी व आयुक्त अभिषेक कृष्णा कायदेशीर मार्गदर्शन मागविणार आहेत.

घंटागाडी ठेकेदारांवर दंडाची कारवाई केली जाणार असून, त्यानंतरही सुधारणा न झाल्यास ठेका रद्द करण्याचा विचार केला जाणार असल्याचे महापौर भानसी यांनी जाहीर केले. स्वाइन फ्लूच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरणाऱ्या डुकरांच्या मालकांवर कारवाई करावी, उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे, तसेच श्‍वान निर्बीजीकरणाच्या कामकाजाकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. पेस्ट कंट्रोलसाठी वापरात येणाऱ्या औषधाचा दर्जा नगरसेवकांनी तपासण्याच्या सूचना केल्या. सभागृहनेते दिनकर पाटील यांनी रात्रपाळीची सफाई बंद करण्याची मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com