तहानलेल्या गणेशगावकरांनी मांडला लघुपटाद्वारे पाण्याचा प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

नाशिक - गोदावरीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील गणेशगाव येथेही तसा दरवर्षी हमखास पाऊस पडतो, परंतु प्रत्येक उन्हाळ्यात या गावातील रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यांची व्यथा आतापर्यंत समजून घेतली नाही. यामुळे आपला प्रश्‍न आपणच मार्गी लावण्याच्या हेतूने सरपंच शरद महाले यांनी ग्रामस्थांच्या पाण्यासाठीच्या संघर्षाचे त्यांच्यावरच चित्रण करून तहानलेले गणेशगाव या लघुपटाची निर्मिती केली आहे. त्या माध्यमातून गावाच्या पाण्याचा प्रश्‍न राष्ट्रपतींपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. आता या लघुपटानंतर तरी पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल, असा ग्रामस्थांना विश्‍वास आहे.

गणेशगावच्या रहिवाशांच्या नशिबी दरवर्षी फेब्रुवारी ते जून भीषण पाणी टंचाई असते. महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शासन दरबारी अर्ज, विनंत्या करून हेलपाटे मारूनही पाण्यासाठीची वणवण थांबली नसल्याने हताश न होता या समस्येवर मात करण्यासाठी येथील ध्येयवेड्या लोकांनी पाण्याची समस्या राष्ट्रपतींपर्यंत पोचविण्याचा चंग बांधला. त्यातूनच येथील पाणी टंचाईची भीषणता मांडणाऱ्या लघुपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. सरपंच शरद महाले व पोलिस पाटील देवचंद महाले यांनी आधुनिकतेचा वसा घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पाणी टंचाईवर भाष्य करणाऱ्या "तहानलेले गणेशगाव' या लघुपटाची निर्मिती केली. विशेष म्हणजे या गावातील अबाल वृद्धांनी या लघुपटात काम केले आहे. नाशिकच्या अभिव्यक्ती मीडिया सेंटर यांनी प्रशिक्षण देण्याचे काम केले. नुकतेच जिल्हा परिषद सदस्या रूपांजली माळेकर यांच्या हस्ते या लघुपटाचे प्रकाशन झाले. जिल्हा परिषद सदस्या रूपांजली माळेकर यांनी या गावाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतारी प्रयत्न करत टंचाईमुक्त गाव करण्याची ग्वाही दिली. या आगळ्या वेगळ्या लघुपटातून शासकीय यंत्रणेचे पाण्याची दाहकता समजून लवकर पाणी प्रश्न सुटावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.