झाड कोसळून तीन वाहनांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

जुने नाशिक - रामकुंड परिसरातील कपालेश्‍वर पोलिस चौकीशेजारी असलेले बोरीचे झाड आज दुपारी कोसळल्याने तीन वाहनांचे नुकसान झाले. या घटनेत चारचाकीतील चालक थोडक्‍यात बचावला. यामुळे काही वेळ परिसरात गोंधळ उडाला. काही तासांसाठी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

गेल्या शनिवार (ता. १९)पासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे पंचवटी सार्वजनिक वाचनालयाच्या रस्त्यावर कपालेश्‍वर पोलिस चौकीशेजारील धोकादायक बोरीचे झाड रविवारी (ता. २१) दुपारी बाराच्या सुमारास तीन वाहनांवर कोसळले. त्यात चारचाकी (एमएच १४- डीएन ७०८२), दुचाकी (एमएच १५-ईएच ७०११, एमएच १५- ईएन १८८६) यांचे नुकसान झाले. झाड कोसळल्यानंतर चारचाकीचा चालक वाहनातच होता. वाहनावर झाड कोसळूनही सुदैवाने चालकाला इजा झाली नाही. अग्निशामक विभाग व पंचवटी उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कटरच्या सहाय्याने झाड कापून त्याखाली अडकलेली वाहने बाहेर काढली. पोलिसांनी येथील रस्ता वाहतुकीला बंद केला होता.

कटरच्या सहाय्याने झाडाचे तुकडे करून रस्ता मोकळा केला. कोसळलेल्या झाडाला लागूनच असलेल्या जुन्या वाड्याच्या भिंतीत पिंपळ वाढला असून, तो धोकादायक ठरत आहे. वाड्याच्या मालकांना याबाबत नोटीसही दिली आहे. त्यांनी दुर्लक्ष केल्याची माहिती उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.