सीसीटीव्ही असलेले टोइंग व्हॅन लवकरच रस्त्यावर

सीसीटीव्ही असलेले टोइंग व्हॅन लवकरच रस्त्यावर

नाशिक - मुदतवाढीनंतर वादग्रस्त ठरलेल्या वाहनांच्या टोइंग ठेकेदाराची मुदत आठवडाभरात संपत आहे. दुसरीकडे नव्या ठेकेदाराने वाहन टोइंगसाठी कंबर कसली आहे. वाहनचालकांची ओरड होऊ नये, यासाठी तो वाहनांची टोइंग केल्या जाणाऱ्या वाहनांनाच सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहे. शहरातील वाहन पार्किंगचे पट्टेही नव्याने ठेका देण्यात आलेल्या ठेकेदारांकडून मारले जात आहेत. त्यामुळे नवीन वर्षामध्ये वाहनचालकांना टोइंग ठेकेदार वा त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून चांगल्या वागणुकीची व मनस्ताप न होण्याची अपेक्षा आहे.

फेब्रुवारी २०१६ मध्ये पोलिस आयुक्तालयातर्फे शहरातील बेशिस्त वाहनांविरोधात व कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ‘टोइंग’ पुन्हा सुरू करण्यात आले होते. संबंधित ठेकेदारास वर्षभरासाठी देण्यात आलेला ठेका वादग्रस्त ठरला. त्यामुळे गेल्या फेब्रुवारीमध्ये मुदत संपली. पण त्याच वेळी महापालिका निवडणुका असल्याने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली गेली. मात्र तेव्हापासून आतापर्यंत त्यास सतत मुदतवाढ मिळाली तर वाहतूक पोलिस शाखेने दोन वेळा ई-निविदा काढूनही ठेकेदार मिळाला नव्हता. अखेर तिसऱ्या निविदेमध्ये आलेल्या निविदेनुसार एका ठेकेदाराची निवड केली आहे. त्याद्वारे येत्या ८ जानेवारीपासून वाहनांचे टोइंग सुरू केले जाणार आहे. 

गर्दीच्या ठिकाणी नो-पार्किंगचे पट्टे 
कॉलेज रोड, महात्मा गांधी रोड, शरणपूर रोड, शालिमार या गर्दीच्या ठिकाणी नो-पार्किंगचे फलक असले तरी पट्टे नव्हते. त्या ठिकाणी नवीन ठेकेदाराकडून पट्टे मारले जात आहेत. ज्यामुळे वाहनांना पार्क करण्याची शिस्त लागेल आणि टोइंग कर्मचारीही या पट्ट्याबाहेरीलच वाहनांचे टोइंग करू शकतील. प्रत्यक्षात ही जबाबदारी महापालिकेच्या अखत्यारीतील वाहतूक शाखेच्या उदासीनतेमुळे ठेकेदारच ही कामे करत आहेत. 

गृहराज्यमंत्र्यांनी मागितला चौकशी अहवाल
‘सकाळ’मध्ये २९ डिसेंबरला प्रसिद्ध झालेल्या सीसीटीव्ही प्रस्ताव बारगळल्याच्या वृत्ताची दखल गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी घेत, अप्पर मुख्य सचिव (गृह) यांना सीसीटीव्ही प्रस्तावाबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. अर्थसंकल्पात तरतूद होऊनही तसेच तीनदा घोषणेनंतर शहरात ३०२ ठिकाणी ९०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंिबत आहे. गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशामुळे नाशिक पोलिसांना सीसीटीव्ही मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

पोलिस- वाहनचालक वादाचे चित्रण
राज्याचे गृहराज्यमंत्री यांनीच टोइंग वाहनांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना केल्या होत्या. यामुळे वाहतूक पोलिस आणि वाहनचालक यांच्यात होणाऱ्या वादाचे चित्रण होऊन वरिष्ठांपर्यंत घटनेची सत्यता पोचण्यास मदत होईल. वाहतूक पोलिसांवर भ्रष्टाचाराच्या होणाऱ्या आरोपातही तथ्य आढळल्यास कारवाई शक्‍य होईल.

नवीन ठेकेदारामार्फत शहरात टोइंग सुरू केले जाईल. त्या संदर्भात आज बैठक झाली असून, टोइंगसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करून टोइंग सुरू होणार आहे.  
- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

८ जानेवारीपासून टोइंगला सुरवात होईल. परदेशातून टोइंग वाहने आणली असून, वाहनचालकांचा मनस्ताप टाळण्यासाठी वाहनालाही सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. सुरक्षित वाहतूक-पार्किंगमुळे शहराची ओळख निर्माण होईल. 
- समीर शेटे, वाहन टोइंग ठेकेदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com