टोमॅटो लागवड ३० टक्‍क्‍यांनी घटण्याची चिन्हे

टोमॅटो लागवड ३० टक्‍क्‍यांनी घटण्याची चिन्हे

नाशिक - भावातील घसरणीमुळे यंदा टोमॅटोचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यात टोमॅटो लागवडीकडील हात शेतकऱ्यांनी आखडता घेतला आहे. त्यामुळे तीन टन बियाणे विकल्या जाणाऱ्या जिल्ह्यात यंदा निम्मे बियाणे पडून राहण्याची भीती व्यापाऱ्यांमध्ये आहे. रोपवाटिकांमध्ये पन्नास टक्के रोपे पडून आहेत. ही सारी परिस्थिती पाहता, टोमॅटो लागवड क्षेत्रात ३० टक्‍क्‍यांहून अधिक घट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

देशांतर्गत मागणीच्या तुलनेत टोमॅटोची आवक होत नसल्याने भाव वाढले आहेत. दिल्लीमध्ये मागील महिन्यात दिवसाला चार हजार क्विंटल टोमॅटोची आवक व्हायची. त्यास ९३४ ते एक हजार ८०० आणि सरासरी २०० रुपये क्विंटल असा भाव मिळाला होता. आज तीन हजार ६६१ क्विंटल टोमॅटोची आवक झाली असून, त्यास दोन हजार ९०३ ते चार हजार २८३ आणि सरासरी बाराशे रुपये क्विंटल असा भाव मिळाला. टोमॅटोचे भाव एका महिन्यात दुपटीपासून पाच पटीपर्यंत वाढले आहेत. दरम्यान, यंदा सुरवातीपासून पाकिस्तानमधील टोमॅटोची निर्यात थांबलेली आहे. हीच स्थिती हंगामात कायम राहिल्यास टोमॅटोचे भाव कोसळण्याची भीती आहे.

जिल्ह्यातून ऑगस्ट ते नोव्हेंबरमध्ये दिवसाला २० टनांचे दीडशे ट्रक टोमॅटो पाकिस्तानमध्ये तर बांगलादेशला ४० ट्रक रवाना होतात. आखाती देशांमध्ये ५० कंटेनरभर टोमॅटो निर्यात होतात. जानेवारीपासून पाकची निर्यात थांबली आहे. 
-मिनाज शेख, टोमॅटो निर्यातदार

टोमॅटोच्या लागवडीसाठी २० टक्के बियाणे, तर ८० टक्के रोपांचा वापर करतात. पाण्याच्या उपलब्धतेनुसार मेपासून शेतकरी लागवडीला सुरवात करतात. पण रोपे खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही.
-मधुकर गवळी, रोपवाटिकेचे मालक

शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत आणि लागवडीसाठी काही शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. ही सारी परिस्थिती पाहता, निम्मे बियाणे विकले जाईल काय, हा प्रश्‍न कायम आहे.
-संजय हिरावत, बियाणे विक्रेते

राज्यात ३० हजार हेक्‍टर क्षेत्र
नाशिक, पुणे, सातारा, नगर, नागपूर, सांगली हे राज्यातील प्रमुख जिल्हे टोमॅटो उत्पादक म्हणून ओळखले जातात. टोमॅटोच्या लागवडीखालील क्षेत्र ३० हजार हेक्‍टरपर्यंत आहे. जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये ११ हजार ५५० हेक्‍टरवर टोमॅटोची लागवड झाली होती. गेल्या वर्षी हीच लागवड ११ हजार ५०७ हेक्‍टर होती. दर वर्षी जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दोन लाख ९० हजार टनांपर्यंत शेतकरी उत्पादन घेतात. जळगावमध्ये ६५०, नंदुरबारमध्ये ५२, धुळ्यात ५५० हेक्‍टरवर टोमॅटोची लागवड केली जाते. टोमॅटोची लागवड करण्यासाठी बाजारात १० ग्रॅमचे ४०० ते दीड हजार रुपयांचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. टोमॅटोचा एकरी उत्पादन खर्च ७० हजार रुपयांपर्यंत असून, ४० ते ५० टनांचे उत्पादन शेतकरी घेतात. नाशिक जिल्ह्यातील रोपवाटिकांमधून ३५ ते ४० कोटी रोपे विकली जातात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com