टोमॅटो न स्वीकारण्याचे पाकिस्तानचे धोरण कायम

महेंद्र महाजन
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

नाशिक - पाकिस्तानने गेल्या वर्षी टोमॅटो स्वीकारण्यास प्रतिबंध घातला. हीच आडमुठी भूमिका यंदाही कायम असल्याने पाकिस्तानकडे टोमॅटो घेऊन जाणारे दररोजचे शंभर ट्रक बंद आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत ऐन हंगामात दहा रुपये किलो भावाने टोमॅटो विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पाकिस्तानमध्ये टोमॅटो निर्यात होत राहिला असता, तर दुप्पट भाव मिळणे शक्‍य होते, असे व्यापारी सांगतात.

एका ट्रकमधून 18 ते 22 टन टोमॅटो पाकिस्तानकडे पाठवला जायचा. त्यामुळे आवक वाढली, तरीही भावामध्ये फारशी घसरण होत नसे. आता मात्र पाकिस्तानला जाणारे ट्रक बंद झाल्याने टोमॅटोचे भाव कोसळले असून, दोन हजार जण बेरोजगार झाले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत 300 ते 350 रुपये 20 किलोचे क्रेट असा भाव टोमॅटोला मिळत होता. आता मात्र 180 ते 250 रुपयांवर समाधान मानावे लागत आहे.

'पाकिस्तानमधील व्यापाऱ्यांनी टोमॅटो विकत घेण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार मागील आठवड्यात 70 ट्रकभर टोमॅटो पाकिस्तानच्या सीमारेषेपर्यंत पाठवण्यात आले होते. पण ट्रक पोचल्यावर पाकिस्तानमधून टोमॅटो स्वीकारण्यास असहमती दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे आता सारी मदार दुबई व बांगलादेशच्या बाजारपेठेवर आहे.''
- सोमनाथ निमसे, टोमॅटो व्यापारी, पिंपळगाव बसवंत

एक हजार उत्तर भारतीय दाखल
टोमॅटोचा हंगाम सुरू झाल्याने उत्तर भारतातील एक हजार व्यापारी टोमॅटो उत्पादक पट्ट्यात दाखल झाले आहेत. निर्यातीसाठी 20 किलोच्या क्रेटला 300 ते 325 रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे.

टोमॅटोचे आगार असलेल्या पिंपळगाव बसवंत भागातून दुबईला दररोज 10 ते 15 कंटेनरभर टोमॅटोची निर्यात केली जाते; तसेच 15 ट्रक टोमॅटो बांगलादेशकडे रवाना होतात. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी 11 हजार 560 हेक्‍टरवर 2 लाख 42 हजार 760 टन टोमॅटोचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे. यंदा 11 हजार 410 हेक्‍टरवर लागवड झाली असून, उत्पादन 2 लाख 28 हजार 200 टन अपेक्षित आहे