पर्यटनाद्वारे रोजगारनिर्मिती; 18 महिन्यांचा रोडमॅप 

पर्यटनाद्वारे रोजगारनिर्मिती; 18 महिन्यांचा रोडमॅप 

नाशिक - ऋषिमुनींची तपोभूमी, सिद्धांची योगभूमी, फुलांच्या मुबलक आवकेमुळे गुलशनाबाद, यात्रेकरूंचं (पिलग्रीम), द्राक्ष (ग्रेपसिटी), ऊस, कांद्याचं आणि आता वाइनचं शहर (सिटी) यांसारखी बिरुदावली मिरवणारं नाशिक या गुणवैशिष्ट्यांमुळेच देशभर परिचित आहे. "नाशिक' केवळ वीकेंडचे नव्हे, तर वर्षभर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे केंद्रबिंदू बनले आहे. त्यामुळेच पर्यटनवाढीसाठी वेलनेस सेंटर-इको स्पोर्टस्‌, मेडिकल व ऍडव्हेंचर टुरिझमचे उपक्रम नाशिकमध्ये राबविले जातील. त्यासाठी अठरा महिन्यांचा रोडमॅप तयार आहे. शिवाय रोजगार निर्मितीचा उद्देश साध्य करण्यासाठी शंभर टक्के सहकार्य राहील, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे संचालक (पर्यटन) आशुतोष राठोड यांनी आज दिली. 

पर्यटनाला चालना देण्यासाठी ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ नाशिक (तान)तर्फे सात ते नऊ सप्टेंबर या कालावधीत नाशिकमध्ये "ट्रॅव्हल मार्ट' उपक्रम राबविला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'तर्फे आज "राउंड टेबल' घेण्यात आले. त्यात पर्यटन विकास संस्थांनी विविध उपाय व सूचना मांडल्या. "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी प्रास्ताविक केले. "सकाळ'तर्फे पर्यटन विकासाला समोर ठेवून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यंदाचा दिवाळी अंक पर्यटन विकासावरच आहे. त्यात टीव्हीवरील मालिकेतील नाशिकच्या तीस कलाकारांना सामावून घेण्यात आल्याचे सांगताना ट्रॅव्हल मार्टच्या माध्यमातून कौशल्यविकासाला चालना मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा श्री. माने यांनी व्यक्त केली. प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, "तान'चे अध्यक्ष दत्ता भालेराव आदी उपस्थित होते. 

श्री. राठोड यांनी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी "सकाळ' या प्रभावी माध्यमाने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. नाशिकच्या पर्यटन विकासाबाबत बोलताना ते म्हणाले, की मुंबईपासून जवळ असलेल्या लोणावळा, खंडाळा भागाचा पर्यटन विकास मोठा झाला. त्या तुलनेत इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वर परिसराचा पुरेसा विकास झाला नाही. त्यामुळे इगतपुरी- त्र्यंबकेश्‍वर भागात वेलनेस सेंटर उभारले जाणार आहे. त्यासाठी दीडशे एकर जागा निश्‍चित करण्यात आली आहे. त्यात स्पोर्टस, मेडिकल, ऍडव्हेंचर, इको टुरिझमला चालना दिली जाणार आहे. "तान'चे सदस्य देश-परदेशात फिरतात. त्यांना जे काही चांगले दिसेल त्याबाबत "एमटीडीसी'ला सुचवा, त्याची अंमलबजावणी तातडीने केली जाईल. जयप्रकाश रावल यांनी पर्यटन मंत्रालयाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर या विभागात आमूलाग्र बदल केले जात आहेत. 

विविध महोत्सवांद्वारे वेगळी ओळख 
नाशिकच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यात नैसर्गिक सौंदर्य लक्षात घेऊन मॉन्सून महोत्सव भावली धरणाच्या परिसरात होत आहे. त्यात पारंपरिक घेळ, संगीत मैफल, मड बाथ-कबड्डी यांसारखे उपक्रम होणार असल्याचे "एमटीडीसी'चे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे यांनी सांगितले. दीप महोत्सवात रामकुंड परिसरात दिव्यांची आकर्षक मांडणी, पतंग महोत्सव होईल. जिल्ह्यातील 101 ट्रेकिंग पॉइंटवर ट्रेकिंग महोत्सव भरविला जाईल. गुलशनाबादची ओळख जपण्यासाठी पुष्प महोत्सव, तर येवल्यात प्रसिद्ध पैठणी तयार केल्या जातात. त्यामुळे पैठणी महोत्सव, वाइनला चालना देण्यासाठी वाइन महोत्सवाचे नियोजन आहे. 

जयकुमार रावल यांनी पर्यटन मंत्रालयाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर या विभागात आमूलाग्र बदल केले जात आहेत. ‘तान’चे सदस्य देश-परदेशात फिरतात. त्यांना जे काही चांगले दिसेल त्याबाबत ‘एमटीडीसी’ला सुचवावे. त्याची अंमलबजावणी तातडीने केली जाईल. 
- आशुतोष राठोड, संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

तज्ज्ञ म्हणतात...  
प्रत्येकाचा हवा सहभाग 
पर्यटनाच्या बाबतीतील नाशिकच्या क्षमता लोकांपर्यंत पोचविण्यासाठी ट्रॅव्हल मार्ट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. देशभरातील सहाशे ट्रॅव्हल एजंटांना निमंत्रित करण्यात आले आहे. सायकल टूर, वाइन टूर, धार्मिक पर्यटन दाखविले जाणार आहे. रिक्षापासून ते पैठणी शॉपपर्यंत दुकाने दाखविण्याबरोबरच सर्वसामान्य लोकांना भेटण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. 
- दत्ता भालेराव, अध्यक्ष, तान 

सार्वजनिक स्वच्छतेवर भर असावा 
सार्वजनिक शौचालयांबरोबरच शहरात जागोजागी डस्टबिन निर्माण करण्याची गरज आहे. यातून स्वच्छतेचा संदेश पर्यटकांमार्फत पोचतो. शहर व परिसरातील पर्यटन केंद्रांची माहिती देण्यासाठी टूर मॅनेजर असले पाहिजेत. शिर्डी, शनिशिंगणापूर, तसेच अन्य धार्मिक स्थळांच्या ठिकाणी नाशिकसंदर्भातील जाहिरात असावी. गंगा आरती नियमित सुरू करताना गोदावरीत लेझर शोही दाखवावा. 
- मनोज वासवाणी, सरचिटणीस, तान 

वायनरीपर्यंत रस्ते हवेत 
महाराष्ट्रात 148 पैकी 70 वायनरी नाशिकमध्ये आहेत. वायनरीचा ट्रेंड वाढत असल्याने वाइन टुरिझम झपाट्याने वाढत आहे; परंतु वायनरीपर्यंत पोचण्यासाठी रस्ते अपुरे आहेत. अरुंद रस्त्यांमुळे पर्यटकांना अनेक वायनरीपर्यंत पोचता येत नाही. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी वायनरींपर्यंतचे रस्ते विकसित केल्यास पर्यटनाला चालना मिळेल. 
- मनोज जगताप, समन्वयक, नाशिक वाइन टुर्स 

गोदा आरती नियमित व्हावी 
रामकुंडासह शहरातील अन्य धार्मिक स्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोचवली पाहिजे. जगभरात त्र्यंबकेश्‍वर येथे कालसर्प, नारायण नागबली, त्रिपिंडी विधी होतात. या विधींची माहिती देशभरात पोचवल्यास पर्यटकांचा ओघ त्र्यंबकेश्‍वरकडे वाढेल. हनुमान जन्मस्थान, मांगीतुंगी या स्थळांपर्यंत भाविकांना पोचविले पाहिजे. 
- नीलेश शर्मा, शर्मा टुरिस्ट 

गाइड, चालकांना द्या प्रशिक्षण 
धार्मिक किंवा अन्य पर्यटनासाठी पर्यटक शहरात येतात त्या वेळी त्यांची पहिली गाठ रिक्षा, टॅक्‍सीचालकांशी होते. त्या वेळी त्यांच्याकडून योग्य वर्तन न घडल्यास नकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत पोचते. त्यामुळे वाहतूक करणाऱ्या व्यक्ती व संस्थांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. 
- प्रशांत आहेर, आस्था टुरिझम 

नाशिक मुक्कामाचे व्हावे ठिकाण 
पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. त्या कोणत्या याबाबत युवकांमध्ये जागृती व्हावी. मुंबईपासून नाशिकचे अंतर जवळ असल्याने नाशिक मेडिकल हब व्हावे. नाशिक, पुणे, औरंगाबाद व पुणे असा पर्यटनाचा ट्रॅंगल विकसित व्हावा. 
- राजेंद्र बकरे, उपाध्यक्ष, तान 

मुलांच्या पर्यटनाच्या गरजा लक्षात घ्या 
मुलांच्या सृजनशीलतेला वाव मिळावा म्हणून पर्यटनाची केंद्रे विकसित झाली पाहिजेत. जसे, की तारांगण, वारली पेंटिंगचा प्रसार व्हावा. मेडिकल टुरिझमला नाशिकमध्ये संधी आहे. त्याचा विचार व्हावा. नांदूरमध्यमेश्‍वर येथे फोटोग्राफीसाठी स्वतंत्र व्यवस्था व्हावी. देवळाली आर्टिलरी सेंटरमध्ये म्युझियम आहे, पण त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याने ती माहिती पर्यटकांपर्यंत पोचली पाहिजे. 
- दत्ता टाक, सदस्य, तान 

शैक्षणिक हब म्हणून विकास व्हावा 
राज्यात पुण्यानंतर नाशिकमध्ये मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत. परराज्यांतील विद्यार्थी या संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यामुळे नाशिकची ओळख शैक्षणिक हब म्हणून झाली पाहिजे. शहरात सिटी टूर आयोजित करावी जेणेकरून पर्यटनाबरोबरच नाशिकचे वाडे, पैठणी, द्राक्ष, भांडी, देवघर, चांदी याची माहिती द्यावी. 
- सिराज शेख, नेहा ट्रॅव्हल्स 

तारांगण, लेझर शोला मिळावी चालना 
विद्यार्थ्यांची सृजनशीलता वाढविण्यासाठी "तारांगण'चा विकास झाला पाहिजे. अनेक वर्षांपासून एकच शो असल्याने प्रतिसाद मिळत नाही. महापालिकेने त्याकडेही लक्ष दिले पाहिजे. शहरात ऍम्युझमेंट पार्क, वॉटर पार्क असावे. वीकेंड टुरिझमच्या अनुषंगाने केंद्र विकसित झाले पाहिजे. 
- अरुण सूर्यवंशी, संचालक, मातोश्री ट्रॅव्हल्स 

सोमेश्‍वर धबधबा, गंगापूर धरण पर्यटनाचे केंद्र व्हावे. नाशिक व त्र्यंबकेश्‍वरचे दर्शन होण्यासाठी हेलिकॉप्टरवरून जॉय राइडसारखे प्रयोग केले पाहिजे. नाशिकमध्ये खाद्यपदार्थांची चौपाटी झाल्यास पर्यटकांसाठी चांगले आकर्षण निर्माण होऊ शकते. पर्यटन विकासाला गतीने चालना मिळेल. 
- अमोल जोशी, संचालक, पूर्वा पर्यटन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com