त्र्यंबकराजाचे दर्शन अमरनाथ यात्रेहून बिकट!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

बेजबाबदार प्रशासन, देवस्थानामुळे भरडताहेत भाविक

बेजबाबदार प्रशासन, देवस्थानामुळे भरडताहेत भाविक

त्र्यंबकेश्‍वर - देशभरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्र्यंबकेश्‍वर पालिका व देवस्थानच्या बेजबाबदार नियोजनाचा फटका बसत आहे. घाणीचे साम्राज्य तुडवून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता पावसाळ्यात सचैल भिजत देवदर्शनाच्या रांगेत उभे राहावे लागणार, असे दिसते. त्याची रंगीत तालीम मागील तीन दिवसांत दिसली. शनिवार ते सोमवारच्या सलग सुट्यांच्या पार्श्‍वभूमीवर दर्शनाला आलेल्या भाविकांना घाणीच्या ढिगाऱ्यापासून सुविधा, पार्किंग अशा सर्वच गोष्टींचा सामना करावा लागला. या झालेल्या परवडीबद्दल अनेक भाविकांनी रोष व्यक्त केला.

शनिवार ते सोमवार अशा सलग सुट्यांमुळे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी शनिवार पहाटेपासूनच भाविकांची त्र्यंबकेश्‍वरला वर्दळ सुरू झाली. उत्तर दरवाजा ते तालुका रुग्णालयादरम्यान भाविकांच्या रांगेला तीव्र पावसाचा सामना करावा लागला. एरवीदेखील पूर्व दरवाजातून वाहणाऱ्या प्रसाधनगृहाच्या पाण्याचे अडथळे पार करीत देवदर्शन करावे लागते. मात्र, या तीन दिवसांत भाविकांना त्र्यंबकेश्‍वराच्या दर्शनासाठी अमरनाथ यात्रेपेक्षा बिकट दिव्यातून जावे लागल्याच्या खोचक प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केल्या. सर्वत्र पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याने स्त्रिया, बालके व ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या परवडीला सामोरे जावे लागले.

भाविकांच्या तक्रारींचाही पाऊस
परराज्यांतून आलेल्या भाविकांनी या सर्व अनागोंदीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यातील काही अशा ः
दोनशे रुपये देऊन दर्शन घेणारे भाविकही दीड तास रांगेत
झटपट दर्शन देण्याचा बेकायदा व्यवसाय करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट.
त्र्यंबकेश्‍वरमध्ये प्रवेश करताच विविध लुबाडणुकीस सुरवात.
मुसळधार पावसातही मंडप व तंबू फाटलेले.
सार्वजनिक स्वच्छतागृह अस्वच्छ. भाविकांच्या आरोग्याचा प्रश्‍न बनू शकतो तीव्र. 

विश्‍वस्तांतील बेबनावामुळे अनागोंदीची चर्चा
स्वच्छतेसह संबंधित कामांसाठी ठेकेदारांची नियुक्ती असूनही सुविधांकडे कुणाचेही लक्ष नसल्याने अशी परिस्थिती उद्‌भवली आहे. देवस्थानाच्या विश्‍वस्तांमधील वाढता बेबनाव यामागे असल्याची चर्चा त्र्यंबकेश्‍वरमध्ये रंगताना दिसत आहे.