अस्थि विसर्जनाऎवजी इथले गावकरी करतात वृक्षारोपण

माणिक देसाई 
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

तरुणांनी गंगुबाई गवळेंच्या दशक्रिया विधीच्या दिवशी गाव परिसरात साडेआठशे वृक्षारोपण करण्याचा निश्चय केला. गावातील सर्व मंदिरे, सार्वजनिक जागा, पडीक जागा. स्मशानभुमी, घरे,शेती वाडी आदी परिसरात रेनट्री,शिसव,खैर,गुलमोहर,कांचन,जांभुळ, आंबा, चिंच आदी प्रकारातील वृक्षारोपण करत संकल्पपुर्ती केली आहे

निफाड -  हिंदु धर्मात  म्रुत्युनंतर मानवावर आग्नीसंस्कार केले जातात त्या नंतर त्याची राख होते ती राख  विसर्जन विधिपुर्वक गंगेत करण्याची परंपरा व शास्त्र आहे मात्र या परंपरेला छेद देत  निफाड तालुक्यातील रौळस गावाने आपल्या पुर्वजांच्या म्रुत्युपश्चात स्मृति जोपासण्यासाठी त्या राखेचे विसर्जन न करता वृक्षारोपणासाठी खोदलेल्या खड्यात राख ठेवुन त्यावर संबंधिताच्या स्मृतिप्रित्यर्थ वृक्षारोपण करण्याचा ऐक आगळा वेगळा  उपक्रम सुरु केल्याने यामुळे  पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे

निफाड तालुक्यातील रौळस येथील गंगुबाई गवळे या व्रुध्देचा दिड महिन्यापुर्वी म्रुत्यु झाला होता अंत्यविधीसमयी त्यांना अखेरचे वस्त्र देण्यासाठी नातेवाईकांनी  भरपुर कपडे (पातळे) आणलेले होते सामाजिक कार्यकर्ते तथा पिंपळगांव बाजार समितीचे माजी संचालक माणिकराव शिंदे यांचेसह सहकार्यांनी सदर कपडे गोर गरिब गरजुंना देण्याबाबत विचार मांडला. त्यास गवळे परिवार व नातेवाईकांनी सकारात्मकता दर्शविली. राखेचा कार्यक्रम झालेनंतर त्यांचे अस्थी गंगेत विसर्जित करण्याऎवजी शेताच्या बांधावर पुरण्यात येऊन त्यावरच गंगुबाई गवळेंच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केले. याच प्रसंगाने गावातील आदर्श शेतकरी बहुउद्देशीय कृषी विकास गट व वसुंधरा बहुउद्देशीय कृषी विकास गटातील तरुणांनी गंगुबाई गवळेंच्या दशक्रिया विधीच्या दिवशी गाव परिसरात साडेआठशे वृक्षारोपण करण्याचा निश्चय केला. गावातील सर्व मंदिरे, सार्वजनिक जागा, पडीक जागा. स्मशानभुमी, घरे,शेती वाडी आदी परिसरात रेनट्री,शिसव,खैर,गुलमोहर,कांचन,जांभुळ, आंबा, चिंच आदी प्रकारातील वृक्षारोपण करत संकल्पपुर्ती केली आहे.

रौळसचेच भुमिपुत्र असलेले राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरिक्षक दत्तात्रय पोरजे यांचा गत  महिन्यात मृत्यू झाला. त्यांचे मृत्यू नंतरही त्या अस्थी विसर्जन न करता शेताच्या बांधावर पुरुन स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. दशक्रिया विधीच्या दिवशी पोरजेंचे जिवलग मित्र तथा सापुतारा हाॅटेल असोसिएशनचे सेक्रेटरी तुकाराम कर्डेल यांनी मित्रपरिवारासह सिल्वर ओक इची आदी प्रकारातील वृक्षारोपण स्मशानभुमी व परिसरात केले आहे. मित्रपरिवाराने पोरजे परिवारासह दिवंगत दत्तात्रय पोरजे यांच्या स्मरणार्थ चार लाख रुपये खर्चुन व्रुक्षारोपण केलेल्या झाडांना संरक्षक जाळ्या,स्मशानभुमीचे नुतनीकरण,अंत्यविधी ओटे बांधकाम,पाण्याची टाकी ,स्मशानभुमि परिसारत पेव्हर ब्लाॅक आदी समाज उपयोगी कार्य हाती घेत ते पुर्ण केले आहे. या कामात माणिकराव शिंदे,तुकाराम कर्डेल,सुजित जाधव,सोमनाथ कुंदे,सुनिल शिंदे, विकास जाधव,नितिन कर्डेल,दिपक गायकवाड, विष्णुपंत शिंदे, मिनानाथ जाधव,ज्ञानेश्वर कुंदे, बाजिराव कर्डेल,,लखन शिंदे,दिपक गायकवाड  गवळे ,पोरजे परिवार आदिंसह रौळस ग्रामस्थ यांचे या अनोख्या स्मृति अन समृद्धी  उपक्रमाला योगदान लाभले आहे.

प्रत्येकाच्या घरासमोर झाडे लावली आहेत पडित जागा तसेच शेतीवाडी बांधावर झाडे लावत हा स्मृति जतन करण्याचा उपक्रम राबविला आहे त्याचबरोबर नदीत होणारे प्रदुषणही टळणार आहे 
- माणिकराव शिंदे,  माजी सरपंच रौळस

अनेक वर्षांची घट्ट मैत्री दिवंगत दत्तात्रय पोरजे यांचेसोबत होती  रौळस गावातील सामजिक उपक्रमात सहभागी होत स्मशानभुमी परिसर सुशोभित व नुतनीकरण करणेसाठी पोरजे परिवार व मित्रपरिवाराने योगदान दिले पोरजेंच्या स्मृति यानिमित्ताने चिरकाल राहतील 
- तुकाराम कर्डेल, सेक्रेटरी सापुतारा हाॅटेल असोसिएशन

जबाबदारी समर्थपणे पेलवतोय 
झाडांचे संगोपन करणेसाठी पाणी देण्याची व्यवस्था बचत गटाच्या तरुणांसह स्वयंसेवकांवर आहे  दर पंधरा दिवसांच्या पाणी देण्याच्या जबाबदारीतुन ती पार पाडली जात आहे  गाव परिसर अन स्मशानभुमी  बहारदार व्रुक्षांनी नटलेली‌ दिसेल असे कार्य केले जात आहे 
- सुजित जाधव