अडाणी शेतकऱ्यांचा लढा यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

नाशिक - निरक्षरतेचा गैरफायदा घेत आंबेगावच्या (ता. पेठ) पोस्टमास्टरने चुकीच्या नोंदी करत नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारला. पैशासाठी पीडितांनी टपालाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली; पण हाती काही आले नाही. कष्टाचे पैसे पुन्हा मिळविण्याची आशा त्यांनी सोडून दिली होती; मात्र जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे हुशारीने पीडितांची बाजू मांडत फसवणूक झालेली पाच लाखांची रक्‍कम व एक लाख ८६ हजार रुपयांची नुकसानभरपाई वकील कोमल गुप्ता यांनी मिळवून दिली. २०१४-१५ मध्ये घडलेल्या या प्रकरणात आंबेगाव (ता. पेठ) येथे कार्यरत पोस्टमास्तर के. एम.

नाशिक - निरक्षरतेचा गैरफायदा घेत आंबेगावच्या (ता. पेठ) पोस्टमास्टरने चुकीच्या नोंदी करत नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारला. पैशासाठी पीडितांनी टपालाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली; पण हाती काही आले नाही. कष्टाचे पैसे पुन्हा मिळविण्याची आशा त्यांनी सोडून दिली होती; मात्र जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे हुशारीने पीडितांची बाजू मांडत फसवणूक झालेली पाच लाखांची रक्‍कम व एक लाख ८६ हजार रुपयांची नुकसानभरपाई वकील कोमल गुप्ता यांनी मिळवून दिली. २०१४-१५ मध्ये घडलेल्या या प्रकरणात आंबेगाव (ता. पेठ) येथे कार्यरत पोस्टमास्तर के. एम. पवार यांनी याबाबत न्यायमंचाकडे लेखी स्वरूपात कबुली दिली. 

आंबेगाव पोस्ट कार्यालयात येणाऱ्या शेतमजूर, कामगारांच्या अज्ञानाचा फायदा उचलत भरलेल्या रकमेपेक्षा कमीच्या नोंदी करणे, एकाच खाते क्रमांकाचे तीन पासबुक बनविणे, असे विविध प्रकार सर्रासपणे सुरू होते. लेखी नोंदी असल्याने ही बाब वरिष्ठ पातळीवर लक्षातही येत नव्हती. आपली फसवणूक होत असल्याचे साधारणत: वीस-एकवीस ग्राहकांना लक्षात आले. त्यांनी औरंगाबाद डाकघर व नाशिक डाकघर येथील अध्यक्षांकडे दाद मागितली. टपाल खात्यातील तक्रार निरीक्षकाकडेही याबाबत विचारणा करत न्याय मिळवून देण्यासाठी साकडे घातले; परंतु त्यांच्या हाती निराशा आली. 
पीडितांचे हे प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून वकील कोमल गुप्ता यांच्याकडे आले. त्यांनी २०१७ मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे खटला दाखल केला. हा संपूर्ण प्रकार ऐकून घेत अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी पीडितांच्या बाजूने निकाल दिला आहे.

तक्रारदार वीस व्यक्‍तींपैकी अकरा व्यक्‍तींना प्रत्येकी दहा हजार रुपये नुकसानभरपाई व अर्ज खर्चापोटी दोन हजार, तर नऊ व्यक्‍तींना नुकसानभरपाईपोटी पाच हजार व अर्ज खर्चापोटी एक हजार रुपये अशी एक लाख ८६ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश न्यायमंचाने दिला. याशिवाय फसवणुकीच्या काळात डल्ला मारलेली सुमारे पाच लाख रुपये इतकी रक्‍कम संबंधितांच्या खात्यावर पुन्हा जमा करण्याचाही आदेश दिला.

आंबेगावला पीडित दारिद्र्यरेषेखालील नागरिक होते. विविध ठिकाणी दाद मागून न्याय मिळत नसल्याने ते निराश झाले होते; मात्र न्यायमंचामार्फत योग्य दिशेने तपास झाल्याने अवघ्या आठ महिन्यांत त्यांना न्याय मिळवून देता आला. फसवणूक झाली असेल, तर त्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
- ॲड. कोमल गुप्ता