कल्याणच्या भोंदूबाबाचे  उत्तर प्रदेशात आलिशान घर

कल्याणच्या भोंदूबाबाचे  उत्तर प्रदेशात आलिशान घर

नाशिक - करणी उलटविण्यासाठी लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित भोंदूबाबाच्या उत्तर प्रदेशातील गावी सरकारवाडा पोलिसांनी छापा टाकून २९ तोळे सोन्यासह स्कॉर्पिओ व बुलेट दुचाकी जप्त केली. भोंदूबाबाने जमविलेल्या मायेतून त्याच्या मूळगावी असलेल्या जौनपूर येथे सुमारे ५० लाखांचे आलिशान घर बांधले आहे. उदयराज पांडे असे भोंदूबाबाचे नाव असून, येत्या मंगळवारपर्यंत तो पोलिस कोठडीत आहे. 

भोंदूबाबा उदयराज पांडे (रा. वांगणी, अंबरनाथ, जि. ठाणे) हा मूळचा जौनपूर (उत्तर प्रदेश) येथील आहे. त्याने नाशिकचे व्यावसायिक वीरेंद्र मुथा यांना करणी उलटविण्यासाठी लाखो रुपयांना गंडा घातला. त्याच्याच सांगण्यावरून मुथा यांच्या मुलीने नितीन फिरोदिया यांच्या घरी १४ लाख रुपयांची चोरी केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भोंदूबाबाचे पितळ उघडे पडले आणि गेल्या रविवारी (ता. १२) सरकारवाडा पोलिसांनी त्यास कल्याणमध्ये अटक केली होती. 

त्याच्या कल्याणमधील घराची झडती घेत तेथून संशयास्पद काहीही हाती लागले नसले तरी त्याच्या उत्तर प्रदेशातील जौनपूर या मूळगावी पोलिसांचे एक पथक गेले होते. पथकाने जौनपूर येथून २९ तोळे सोने, स्कॉर्पिओ व एक बुलेट दुचाकी जप्त केली. जौनपूरमध्ये या भोंदूबाबाने अनेकांची फसवणूक करून सुमारे ५० लाख रुपयांचे आलिशान घर आढळले. सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव यांच्या नेतृत्वाखालील पथक जप्त करण्यात आलेल्या ऐवजासह नाशिककडे येण्यास निघाले आहे. 

अल्पवयीन मुलीलाही आणले शोधून
गेल्या १६ तारखेला रविवार कारंजा येथील पेठे हायस्कूलसमोरून १६ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. सरकारवाडा पोलिसांना ही मुलगी उत्तर प्रदेशात जौनपूरमध्ये असल्याची खबर मिळाली होती. ती माहिती जौनपूरला गेलेल्या पोलिस पथकाला देण्यात आल्याने सारिका आहिरराव, पंकज पळशीकर यांच्या पथकाने अल्पवयीन मुलीचा शोध लावून तिला ताब्यात घेतले असून, संशयितालाही अटक केली. या प्रकरणी जौनपूर येथील पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. उद्या (ता. २०) तिला घेऊन पथक नाशिकमध्ये येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com