परसबागेतील 40 ट्रक भाजीपाला मुंबईकडे रवाना 

परसबागेतील 40 ट्रक भाजीपाला मुंबईकडे रवाना 

नाशिक - मुंबईची परसबाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये जलमय स्थितीमुळे मंगळवारी (ता. 29) भाजीपाल्याच्या ट्रक जागेवर उभ्या करण्यात आल्या होत्या. तसेच दुधाचे टॅंकर पोचण्यासाठी पाच तासांचा विलंब झाला. मात्र, पावसाने उसंत घेताच 40 ट्रक भाजीपाला मुंबईकडे रवाना झाला असून, नाशिक विभागातून 18 लाख लिटर दूध पुणे-मुंबईकडे पाठविण्यात आले. 

पावसामुळे बाजार समितीमधील भाजीपाल्याची आणि फळभाज्यांची आवक निम्म्यांनी घटली. मुंबई जलमय झाल्याने बऱ्याच व्यापाऱ्यांनी मुंबईला माल पाठविण्याऐवजी स्थानिक पातळीवर विकणे पसंत केले. परिणामी, भाजीपाल्याच्या भावात घसरण झाली. भाजीपाल्याच्या जुडीमागे ही घसरण पाच रुपयांची राहिली. मेथी- दहा ते 25, कोथिंबीर- 34 ते 40, शेपू- दहा ते 20, कांदापात- दहा ते 32 रुपये जुडी या भावाने विकली गेली. किलोचा वांग्याचा भाव 30 ते 50, फ्लॉवरचा पाच ते दहा, ढोबळी मिरचीचा 18 ते 42, भोपळ्याचा 15 ते 33, कारल्याचा आठ ते 22, दोडक्‍याचा 16 ते 27, गिलक्‍याचा 20 ते 35, भेंडीचा 15 ते 35 रुपये असा भाव राहिला. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी ठाणे, मलाड, बोरविली, विरारकडे ट्रक पाठविण्यास सुरवात केली. गुजरातकडे 15 ते 20 ट्रक भाजीपाला काल रवाना करण्यात आला होता. आज तेवढाच भाजीपाला सूरतकडे पाठविण्यात आला. 

पंचवीस लाख लिटर दुधाचे उत्पादन 
नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांत दिवसाला 25 लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. त्यातील दीड लाख लिटर दूध सूरतला पाठविण्यात येते. उरलेल्या साडेतेवीस लाख दुधापैकी साडेपाच लाख लिटर दूध विभागांतर्गत विकले जाते. या दुग्धोत्पादनाच्या संकलनात सहकार विभागाचा 30 आणि खासगी क्षेत्राचा 70 टक्के वाटा आहे. खासगी क्षेत्रापैकी प्रभाततर्फे दिवसाला एक लाख लिटर दूध मुंबईकडे जाते. हे दूध पोचण्यातील अडचण दूर झाल्याचे प्रभातच्या व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले. एस. आर. थोरात दूध समूहातर्फे दिवसाला एक टॅंकरभर दूध मुंबईकडे रवाना होते. हा टॅंकर पाच तास उशिराने मुलुंडपर्यंत पोचल्याची माहिती या समूहाच्या विपणन विभागाने दिली. दरम्यान, नाशिक शहर आणि जिल्ह्यात दिवसाला दोन लाख लिटर दुधाचे उत्पादन होत असून, दीड लाख लिटर दूध शहरवासीयांना विकले जाते. उरलेले पन्नास हजार लिटर दूध नाशिकमधून मुंबईकरांसाठी पाठविले जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com