सैन्यदलासाठी त्याग, तरीही गावाची विवंचना कायम

सैन्यदलासाठी त्याग, तरीही गावाची विवंचना कायम

आर्टिलरी सेंटरच्या तीन प्रवेशद्वारांपैकी मुख्य प्रवेशद्वार असलेले वडनेर गेट. वडनेर दुमालाचे गावठाण आणि मळे परिसर असा हा बारा हजार लोकसंख्येचा शिवार. पश्‍चिमेस सैन्यदलाची फायरिंग रेंज, मध्यभागचे आर्टिलरी सेंटर, उत्तरेला स्कूल ऑफ आर्टिलरी, सात किलोमीटरवरील हवाई दल असे वैभव असलेल्या शिवारातील शेतकऱ्यांकडे उदरनिर्वाहासाठी शेती राहिलेली नाही. त्यामुळे भाडेकरू अन्‌ भाजीपाल्यासह दुग्धोत्पादनावर उदरनिर्वाह करावा लागतो. पोरजे, पाळदे, कर्डिले, बुटे, उन्हवणे, हिरे, थोरात, वाघमारे, वाघ, आदिवासी कुटुंबीयांसमवेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, केरळ, पंजाब, हरियानामध्ये मूळगाव असलेलेही येथे स्थायिक झालेत. वालदेवी नदीत सोडण्यात येणाऱ्या धरणातील पाण्यावर शेती अवलंबून आहे. कूस बदललेल्या वडनेर दुमालाविषयी...

देवळाली कॅम्प चार, पाथर्डी फाटा सात, नाशिक रोड तीन, नाशिक रोडचे रेल्वेस्थानक चार किलोमीटरवर असलेल्या शिवारातील ६५ टक्के जमीन सैन्यदलासाठी ब्रिटिशांनी घेतल्याचे स्थानिक सांगतात. तत्पूर्वी तालुक्‍यात आडगावच्या बरोबरीने वडनेर दुमालाचा शिवार होता, अशीही पुस्ती जोडली जाते. अंबड बुद्रुक गावाचे क्षेत्र आरक्षित केले गेल्याने पाळदे, पाटोळे, बेरड यांनी नातेवाइकांकडे वडनेर दुमालामध्ये राहावयास येण्याचा निर्णय घेतल्याचा संदर्भ ज्येष्ठांकडून मिळाला. शिवाराचा महापालिकेत समावेश झाला असताना मोहन रुंजा पोरजे सरपंच होते. त्या वेळी ग्रामपंचायतीच्या विहिरीचे पाणी जलकुंभात टाकून तेथून तीन हजार लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरविले जायचे. तीनशे एकरांपर्यंतच्या क्षेत्रापैकी ५० एकरांवर द्राक्षांची बाग आहे. पॉलिहाउसमध्ये फुलांची लागवड करण्यात आली आहे. 

गहू, हरभरा, भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. शेती राहिली नसल्याने खोल्या बांधायच्या आणि सैन्यदलाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना भाड्याने द्यायच्या याकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. याशिवाय दिवसाला दोन हजार लिटर दुधाचे उत्पादन घेऊन शेतकरी ते स्वतः वडनेर गेटच्या रस्त्याच्या कडेला आणि पाथर्डी फाटा भागात नेऊन विकतात. याशिवाय काही स्थानिकांनी शंभरच्या आसपास गाळे बांधले आहेत. त्यातील काहींत स्थानिक व्यवसाय करतात, तर इतरांनी भाड्याने दिलेत. वडनेर गेटजवळ १९६३ मध्ये केंद्रीय विद्यालयाची स्थापना झाली असून, त्यात चौदाशे विद्यार्थी पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतात.

बांधकामांना प्रतिबंध
सैन्यदलाच्या हद्दीपासून शंभर मीटरवर बांधकामासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. पाचशे मीटरवर बांधकाम करण्यासाठी ना हरकत घेण्याची मर्यादा लागू करण्यात आली आहे. त्याबद्दल स्थानिकांमधून नाराजीचा सूर आळवण्यात येत आहे. स्थानिकांना उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ऑक्‍टोबर २०१६ मध्ये हा प्रतिबंध लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पन्नास टक्के बांधकामे बंद पडल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. खरे म्हणजे, अत्यावश्‍यक बाब म्हणून प्रतिबंध लागू करण्यास हरकत असण्याचे कारण नाही. पण गरज नसताना लागू करणे कितपत योग्य आहे, याचा विचार व्हावा, असे गाऱ्हाणे आता थेट केंद्रीय संरक्षण मंत्रालयापर्यंत पोचविण्याचे स्थानिकांनी ठरविले आहे. २००२ मध्ये ९०० मीटरचा प्रतिबंध होता. त्या वेळी संसदेत हा विषय पोचला होता. तेव्हा हा प्रतिबंध रद्द करण्याचे धोरण सरकारने स्वीकारल्याची बाब आवर्जून सांगितली  जात आहे.

वडनेरकरांच्या आग्रही मागण्या
पाथर्डीमध्ये २००५ मध्ये २० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधला, त्यावर पाथर्डी, पिंपळगाव खांब, दाढेगाव, वडनेर गेटचा पाणीपुरवठा अवलंबून आहे, पण आता नवीन भागाकडे पाणी वळविण्यात आले असताना घरे व नळजोडणीची संख्या वाढली असल्याने दोन वेळचे पुरेसे पाणी मिळायला हवे. त्यासाठी भले मग नवीन जलकुंभ बांधावा.

सातपूर, नाशिक रोड-देवळाली आणि नाशिक पालिकांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची कामे झाली होती. पण महापालिकेसाठी समाविष्ट करण्यात आलेल्या खेड्यांमध्ये नागरी विकास पोचलेला नव्हता. त्यामुळे आग्रही मागणी झाल्यावर खेडी विकास निधी देण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले. मात्र पुरेसा निधी मिळत नसल्याने अजूनही बरेच प्रश्‍न अनुत्तरित आहेत. त्यामुळे गाव आणि कामनिहाय महापालिकेच्या स्वतंत्र अंदाजपत्रकीय तरतूद व्हायला हवी.

तत्कालीन महापौर शांतारामबापू वावरे यांच्या काळात अनुराधा थिएटर ते नाशिक रोड गेट हा रस्ता हस्तांतर करून घेण्यात आला. त्याप्रमाणे वडनेर गेट ते देवळाली कॅम्पच्या स्कूल ऑफ आर्टिलरी या मार्गावरील महापालिकेच्या हद्दीतील रस्ता महापालिकेने ताब्यात घेऊन वाहतुकीचा विचार करत त्याचा विस्तार करण्यासह पुलाचे आकारमान वाढवायला हवे. यापूर्वी वालदेवी नदीवर दोन कोटींचा पूल बांधण्यासाठी सैन्यदलाची ना हरकत घेण्याची आठवण त्यासाठी करून देण्यात येते. याशिवाय वालदेवीच्या प्रदूषणाचा तिढा सोडविण्यात यावा.

नवीन विकास आराखड्यात समाविष्ट असलेली ६० मीटर, ३० मीटर, २४ मीटर, १८ मीटर, १५ मीटर रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. त्यातून विकासाचा वेग उंचावण्यास मदत होणार आहे. 

पंपिंग रोड, राजपूत कॉलनी, बुटे मळा, गुप्ता मळा या मळे परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्‍न निकाली निघावा.

वाढलेल्या वस्त्यांमध्ये पक्के रस्ते, पथदीप, गटार, पिण्याच्या पाण्यासाठी जलवाहिनी अशी कामे व्हावीत.

केशव पोरजेंच्या योजना
वडनेर गेट, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब, विहितगाव, सौभाग्यनगर, देवळाली गाव इतका भाग आमच्या प्रभागात समाविष्ट आहे. सैन्यदलाचे सांडपाणी ढोबी मळ्याजवळील वालदेवी नदीत मिसळते. त्यामुळे सैन्यदलाने स्वतःचे मलनिस्सारण केंद्र उभारावे, असा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे. तसेच पूर्वी जिल्हा परिषदेने वालदेवी नदीवर बांधलेला बंधारा फुटला असून, पिंपळगाव खांबवासीयांसाठी पूल बांधण्यासाठी एक कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. वडनेरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा व्हावी असा प्रयत्न असेल. सौभाग्यनगर भागात व्यायामशाळा उभी करायची आहे. देवळाली गावात शॉपिंग सेंटर उभे करायचे आहे. पिंपळगाव खांबवासीयांच्या मागणीनुसार जुन्या नाशिक वाटेचे २५ टक्के काम झाले असून, ७५ टक्के काम केले जाईल.

सैन्यदलासाठी जागा देण्यातून विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना शेतीच्या बदल्यात शेती अथवा मोबदला मिळावा. वारसदारांना केंद्रीय आस्थापनांमध्ये नोकरी मिळावी. आर्टिलरी सेंटरमधील व्यवसायामध्ये विस्थापित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना संधी मिळावी. केंद्रीय विद्यालयात शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना प्रवेश मिळावा. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली स्थानिक मागणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारतर्फे पोचविण्यात येणार आहे. याशिवाय ग्रामपंचायतीपासून घरपट्टी भरणाऱ्या घरांना अनधिकृत म्हणू नये, अशी विनंती केंद्र सरकारला करण्यात येणार आहे.
-प्रभाकर पाळदे, माजी नगरसेवक

माझी एक बिघा जमीन आहे. भाऊ तिच्यामधून म्हशीसाठी वैरणीचे उत्पादन घेतो. वर्षभर शेतीत काम नसल्याने मी ट्रक चालवत होतो. शारीरिक त्रासामुळे आता पार्सल पोचविण्यासाठी छोटा हत्ती हे वाहन चालवितो. आमच्या मळे विभागामध्ये वीज, रस्ते, पाणी या सुविधा व्हायला हव्यात. 
-जयराम पोरजे, स्थानिक रहिवासी

मी वडनेर दुमालाचा रहिवासी. मजुरी करायचो. आता मुले कुटुंबाची जबाबदारी सांभाळतात. सर्व्हिस स्टेशन रस्ता ओलांडून पाइपलाइन गेली आहे. त्यावरून जाताना वाहने आदळतात आणि घरांना हादरे बसतात ही समस्या दूर व्हायला हवी.
-काळूजी पोरजे, स्थानिक रहिवासी


बिघाभर जमिनीत गहू, भाजीपाल्याचे उत्पादन घेतो. वालदेवीच्या पाण्यावर शेती अवलंबून असल्याने उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवितो. आम्ही प्यायला विहिरीचे पाणी वापरतो. आम्हाला महापालिकेने पिण्याचे पाणी पुरवावे. फायरिंग रेंजजवळील मळ्यासाठी रस्ता करावा.
-वामन कर्डिले, स्थानिक रहिवासी

आमच्या कुटुंबाचे ३०० बिघा क्षेत्र आर्मीसाठी गेले. आम्ही पाच भाऊ असून, आम्हाला आता तीन बिघा जमीन उरलीय. त्यावर उदरनिर्वाह अशक्‍य आहे. त्यामुळे दोन भाऊ लाइट फिटिंगची कामे करतात, एक विकासक आहे, एक शेती करतो, तर मी विद्यार्थ्यांची वाहतूक करतो. शेती उरली नाही आणि उरलेली शेती किती जणांना पुरणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे तरुणांना कौशल्याचे प्रशिक्षण देत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात.
-बंडू पोरजे, स्थानिक रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com