सत्तर टक्के पाऊस पडूनही ६३ वाड्या-वस्त्यांवर टॅंकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

नाशिक - जिल्ह्यात यंदा जुलैपर्यंत ७० टक्‍के पाऊस पडला असून, धरणांमध्ये ६३ टक्के साठा झाला आहे. यामुळे समाधानकारक पाऊस झाल्याचे समजले जात असले, तरी जिल्ह्याच्या तीन तालुक्‍यांमधील ४३ गावे, २३ वाड्यांत ६३ टॅंकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. पश्‍चिम पट्ट्यात पाऊस समाधानकारक असला, तरीही पाच तालुक्‍यांमध्ये कमी पावसामुळे भूजलपातळीत कुठलीही वाढ झालेली नसल्याने या तालुक्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून समाधानकारक पावसाला सुरवात झाली. बेमोसमी पावसामुळे कायम दुष्काळी तालुक्‍यांच्या काही भागात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पेरण्यांना प्रारंभ झाला. परंतु मॉन्सूनच्या आगमनानंतर सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव व बागलाण या तालुक्‍यांत केवळ पेरणीपुरताच पाऊस पडल्याने विहिरींना अजूनही म्हणावे तसे पाणी नाही. यामुळे पाणीपुरवठा योजना नसलेली गावे व वस्त्यांवर पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. ही स्थिती लक्षात घेऊन प्रशासनातर्फे जिल्ह्यातील ६३ गावांत अजूनही टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅंकरची स्थिती

तालुका    गावे-वस्त्या
बागलाण    १४
मालेगाव    ५
नांदगाव    ८
सिन्नर    १७
येवला    २२
एकूण    ६३