देवळीकराडला टॅंकरने पाणीपुरवठा

देवळीकराडला टॅंकरने पाणीपुरवठा

कळवण - कळवण तालुक्‍यातील देवळीकराड या आदिवासी गावातील तीनशेपेक्षा अधिक आदिवासी बांधवांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने आज, रविवारी गॅस्ट्रोची लागण ज्या विहिरीच्या पाण्यामुळे झाली तिचे पाणी उपसण्यात येऊन ती स्वच्छ करण्यात आली. दोन दिवस गावाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 

देवळीकराडचे ग्रामपंचायत कार्यालय व सभामंडपामध्ये  १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजही रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने आरोग्य विभागाच्या यंत्रणेची तारांबळ उडाली.   

दूषित पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांना शनिवारपासून जुलाब व वांत्यांचा त्रास जाणवू लागला. बघता बघता रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. सुमारे तीनशेहून अधिक आदिवासी बांधवांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने रुग्णांना देवळीकराडच्या सभामंडपात अक्षरशः जमिनीवर झोपवून औषधोपचार करावे लागले. रुग्णांची संख्या मोठी असल्याने तिऱ्हळ, अभोण्यासह जवळच्या आरोग्य केंद्रात रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. कळवण तालुक्‍याच्या अतिदुर्गम भागात देवळीकराड गाव असून, गावासाठी जलस्वराज्य योजना मंजूर झाली. मात्र गेल्या तीन वर्षांपासून ती कागदावरच पूर्ण करण्यात आल्याची आदिवासी बांधवांची तक्रार आहे. गावाला  जुन्या पडक्‍या विहिरीतून दूषित पाणीपुरवठा केला जातो. ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज गावातील तीनशेहून अधिक आदिवासी बांधवांना गॅस्ट्रोचे शिकार व्हावे लागले. 

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी आरोग्यपथके तैनात करून आदिवासी बांधवांच्या आरोग्याशी खेळ खेळला जाऊ नये, अशी मागणी केली. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाचे अधिकारी देवळीकराड गावात तळ ठोकून आहेत. अतिरिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक देवळीकराडला पाठविण्यात आले असून, पुरेसा औषधसाठाही उपलब्ध करून दिला आहे. या गावाची पाणीपुरवठा योजना तत्काळ कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी बहिरम यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com