लंबोदर ॲव्हेन्यूमधील दारू दुकान अखेर बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

तिडके कॉलनीतील रणरागिणींच्या संघर्षाला यश; ‘सकाळ’ सर्वांच्या साथीला

नाशिक - तिडके कॉलनीतील लंबोदर ॲव्हेन्यूमध्ये दारू दुकान सुरू करण्यास अपार्टमेंटमधील रणरागिणींनी संघर्ष करत विरोध केला. अखेर रणरागिणींच्या विरोधाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने अपार्टमेंटमधील दारू दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला.

तिडके कॉलनीतील रणरागिणींच्या संघर्षाला यश; ‘सकाळ’ सर्वांच्या साथीला

नाशिक - तिडके कॉलनीतील लंबोदर ॲव्हेन्यूमध्ये दारू दुकान सुरू करण्यास अपार्टमेंटमधील रणरागिणींनी संघर्ष करत विरोध केला. अखेर रणरागिणींच्या विरोधाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने अपार्टमेंटमधील दारू दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला.

रस्त्यावर उतरून दारूच्या बाटल्यांची ट्रक अडविण्यापासून ते थेट पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यापर्यंत विरोधाची भूमिका मांडली होती. या रणरागिणींना अर्थातच आमदार सीमा हिरे, आमदार निर्मला गावित, खासदार हेमंत गोडसे, डॉ. प्रशांत पाटील, नगरसेवक डॉ. हेमलता पाटील, नगरसेवक राजेंद्र महाले, नगरसेवक प्रवीण तिदमे यांची साथ लाभली. रणरागिणींच्या संघर्षात प्रत्येक टप्प्यावर ‘सकाळ’ने सामाजिक प्रश्‍नाची धग वृत्ताच्या माध्यमातून मांडली. यापूर्वी सप्तशृंगगडावरील रणरागिणींनी दारूबंदीविरोधात संघर्ष केला होता. याही रणरागिणींच्या लढ्यात ‘सकाळ’ने सामाजिक भूमिका निभावली.  

जल्लोषाऐवजी आभाराला प्राधान्य
‘लंबोदर’मधील दारू दुकान बंद करण्याचा १० ऑगस्टचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रणरागिणींच्या हातात आज पडला. त्याबद्दल जल्लोष न करता आपल्या प्रश्‍नांची तड लावण्यासाठी सहकार्य केलेल्या प्रत्येकाचे थेट संपर्क साधून आभार मानण्यात आले. अपार्टमेंटमधील सर्वच कुटुंबांमधील भगिनींच्या लढ्याला परिसरातील महिलांप्रमाणेच देशस्थ ऋग्वेद संस्थेने पाठबळ दिले.

स्थलांतरास आक्षेपाचा मुद्दा ग्राह्य
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगतच्या अंतराच्या कारणास्तव १ एप्रिल २०१७ पासून पंचवटीतील पेठ रोडवरील दारूचे दुकान बंद झाले. त्यानंतर २८ एप्रिलला दारू दुकान लंबोदरमध्ये स्थलांतरित करण्याचा अर्ज राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सादर करण्यात आला. दुय्यम निरीक्षकांच्या शिफारशीनुसार दुकान स्थलांतर करण्यास परवानगी देण्यात आली. स्थलांतरानंतर तक्रार प्राप्त झाल्यास अथवा आक्षेप आल्यास व्यवहार बंद करण्यास बंधनकारक राहील, अशी अट परवान्यामध्ये घातली.

मात्र अपार्टमेंटच्या करारामध्ये दारूच्या दुकानासाठी गाळा भाड्याने देता येणार नाही, अशी अट असल्याने स्थानिकांनी एकजुटीने दुकानास विरोध केला. जिल्हाधिकारी यांच्याकडे लंबोदरमधील रहिवाशांनी दाद मागितली. सीलबंद बाटलीमधून मद्यविक्री करणार असल्याने या व्यवसायापासून रहिवाशांना त्रास होणार नाही, अशी बाजू दुकानदारने मांडली. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी करारनाम्यानुसारचा आक्षेप ग्राह्य धरत दारू दुकान बंद करणे उचित होईल, असा निष्कर्ष नोंदविला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दारू दुकान बंद करण्याचाही आदेश दिला. परवान्याच्या नियमातील प्रचलित तरतुदी आणि कार्यपद्धतीनुसार इतर ठिकाणी स्थलांतर करता येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

लंबोदरमधील सर्वच कुटुंबांमधील महिलांच्या एकजुटीला मिळालेला हा प्रतिसाद आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे महिलांच्या न्याय हक्काला यश मिळते, हे स्पष्ट झाले आहे. या निर्णयातून संघर्ष करणाऱ्या महिलांचा आत्मविश्‍वास दुणावणार आहे.
- मीना चव्हाण, रहिवासी

आमच्या रणरागिणी रस्त्यावर उतरल्या असताना सामाजिक प्रश्‍नाला ‘सकाळ’ने वाचा फोडली. या प्रश्‍नाची तड लावण्यासाठी आम्हा साऱ्या जणींच्या पाठीशी ‘सकाळ’ची खंबीर साथ मिळाली. त्यामुळे ‘सकाळ’चे आभार मानायला हवेत.
- पूनम पाटील, रहिवासी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे अपार्टमेंटमधील सगळ्या कुटुंबांना आणि परिसरातील रहिवाशांना आनंद झाला. अपार्टमेंटमधील महिलांच्या आंदोलनाला सहकार्य केल्याबद्दल ‘सकाळ’प्रमाणेच लोकप्रतिनिधी आणि अधिकारी, सामाजिक संस्थांचे आभार मानायला हवेत.
- मनीषा धांडे, रहिवासी