राज्यराणी एक्सप्रेसच्या जनरल बोगीतून विवाहीत महिला बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

इगतपुरी (नाशिक) : मध्य रेल्वेच्या नाशिकरोड ते मुंबई असा रेल्वे प्रवास करत असताना इगतपुरी रेल्वे स्थानक दरम्यान रेल्वे गाडीतून विवाहीत महिला बेपत्ता झाल्याबाबत इगतपुरी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इगतपुरी (नाशिक) : मध्य रेल्वेच्या नाशिकरोड ते मुंबई असा रेल्वे प्रवास करत असताना इगतपुरी रेल्वे स्थानक दरम्यान रेल्वे गाडीतून विवाहीत महिला बेपत्ता झाल्याबाबत इगतपुरी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कांतीलाल हिरामण गांगुर्डे (वय 27 वर्ष, नोकरी रा. मुंबई वडाळे) व पत्नी सलोनी कांतीलाल गांगुर्डे (वय 19, राहणार देसगाव तालुका कळवण जिल्हा नाशिक) हे राज्यराणी एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या जनरल बोगीत नाशिकरोडवरून मुंबई करीता प्रवास करीत होते. गाडी इगतपुरी रेल्वे स्थानकातून सुटल्याच्या अगोदर कांतीलाल गांगुर्डे यांना पत्नी सलोनी ही बाथरूमसाठी जाते असे पतीला सांगुन गेली मात्र इगतपुरी रेल्वे स्थानकातुन गाडी जाण्याची वेळ होऊनही ती परत आलीच नाही. रेल्वे बोगीच्या बाथरूममध्ये व सदर गाडीच्या बोगीत कांतीलाल यांनी पत्नीचा शोध घेतला पण ती मिळून न आल्याने आपली पत्नी रेल्वेच्या चालत्या गाडीतून बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्यांनी नोंदवली.

सदर फिर्यादीच्या तक्रारीची दखल घेत लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक एस. के. बच्छाव यांनी कसारा, इगतपुरी, नाशिक रोड रेल्वे स्थानक, परिसरात बेपत्ता महिलेचा शोध घेतला पण ती मिळाली नाही. बेपत्ता महिलाचे नाव सलोनी कांतीलाल गांगुर्डे यांचा रंग गोरा, अंगाने सडपातळ, दोन्ही हातावर व अंगावर काळे डाग, अंगात निळ्या रंगाची जिन्स पॅंट, निळ्या रंगाचे चौकोटी शर्ट, डोक्यावर स्कार्फ, भाषा मराठी, हिन्दी असे वर्णन असलेली महिला कोणाला आढळल्यास पोलीस ठाण्यात माहिती कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास लोहमार्ग पोलिस निरिक्षक एस. के. बच्छाव यांच्या मार्गदर्शंनाखाली ए. एस. आय. त्रिपाठी करीत आहेत.