विकासाला खीळ बसल्याने आता तरी भुजबळ बाहेर येवोत..!

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

आजपासून सुरु होणाऱ्या जामीन अर्जावरील सुनावणीकडे समर्थकांच्या नजरा

येवला (नाशिक) : विकास म्हणजे काय अन् तो कसा करतात हे जिल्ह्याला नव्हे तर राज्याला अवघ्या दहा वर्षात दाखवून देणारे येथील आमदार व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचे नसणे नक्कीच या मतदारसंघातील आम आदमीच्या मनात खुपणारे ठरत आहेत. सत्ता नसली तरी वजन वापरून विकास कसा करून घ्यायचा याचे कसब भुजबळाकडे आहे. मात्र, सत्ता गेली अन त्यांची अडचण सुरु झाली तशीच मतदारसंघाच्या विकासाला देखील खीळ बसली आहे. त्यामुळे आता तरी भुजबळ बाहेर येवोत अन् येथील ठप्प झालेला विकास पुन्हा सुरु होवो, अशी अपेक्षा मतदारसंघाला लागली आहे.

१७ मार्च २०१६ पासून भुजबळ हे तुरुंगात असून, महाराष्ट्र सदनातील घोटाळ्याप्रकरणी व कलिना जमीनप्रकरणी त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. आता पुन्हा भुजबळ यांनी अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) विशेष न्यायालयात जामिनासाठी पुन्हा अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर "ईडी'ला उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, यावर आजपासून (मंगळवार) सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सदनासह अकरा प्रकरणांत गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली छगन भुजबळ अटकेत आहेत. त्यातील ८७० कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी "ईडी'ने चौकशी करीत २७ एप्रिल २०१६ रोजी सुमारे दहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात अन्य ३१ आरोपींना जामीन मंजूर झाला आहे; तर भुजबळ यांना इतर प्रकरणांत जामीन मंजूर झाला आहे. आता या प्रकरणात "ईडी' आणखी चौकशी करीत नसल्याने जामीन मंजूर करण्याची मागणी भुजबळ यांनी केली आहे.

मागील ५० वर्ष विकासाचा स्पर्श न झालेल्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी हेवीवेट बनून आलेल्या असणाऱ्या भुजबळांच्या येथील मंत्री पदाच्या १० व नंतर एक अश्या अकरा वर्षांमध्ये सर्वकाही कामे सुखासुखी होत असल्याने मतदारसंघातील जनता खुष होती. पाण्याचे प्रकल्प, बंधारे, रस्ते, इमारती हे सगळे चकाचक होतांना अनेकांचे जीवनमान उंचावले होते. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिक त्याच्या सोबत असल्याने यापूर्वीची तिसऱ्यांदा होणाऱ्या पराभवाची परंपरा मोडीत काढून त्यांनी तिसऱ्यांदा आमदारकी मिळवली होती. पालकमंत्री काय करू शकतो याचा अनुभव मतदारसंघाबरोबरीने संपुर्ण नाशिक जिल्ह्याने घेतला होता. येवला लासलगाव मतदारसंघाची संपुर्ण राज्यात प्रति बारामती म्हणून विकासचे मॉडेल अशी चर्चा केली जात होती. किंबहुना पक्षप्रमुख शरद पवार यांनी देखील भुजबळांच्या विकासाचे तोंडभरून कौतुक केले होते.

यामुळेच सर्वांना भुजबळ आपले नेते वाटत असून, जामिन अर्जावरील सुनावणी लवकरच सुरु होत असल्याने मतदारसंघातील जनतेचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. मागील दोन दिवसांपासून यावर चर्चा सुरु असून काय होणार याविषयी अंदाज लावत आहे. काही समर्थक सुटकेसाठी प्रार्थना करत असून पुढील दोन-तीन दिवसात यावर निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. आता अधिकारीही कुणाला जुमानत नाहीच पण लोकप्रतिनिधींनाही कोणतीही भरीव कामे करता येत नाही असा अनुभव जनता घेत आहे. विकासकामांना कोणताही निधी मिळत नसल्याने अश्या कामासाठी भुजबळांसारखे दमदार नेतृत्व लागते असे आता भुजबळांचेच विरोधकही म्हणत आहे.

दीड वर्षापासून आमदाराविंना!
मागील दीड वर्षांपासून आमदार नसल्यामुळे काय होते याचा अनुभव घेतल्याने अन् त्यात भुजबळांसारखा दमदार आमदार जनतेत नसल्याने मतदारसंघातील विविध कामांचा अक्षरक्षः बोजवारा उडाल्याने भुजबळांच्या सुटकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. आता सुनावणीमध्ये भुजबळांना जामीन मिळाल्यास आपल्या प्रलंबीत कामांना गती येईल, अशी आशा मतदारसंघाला आहे हे मात्र नक्की..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com