रंगीत तालमीत मारली बाजी पण अंतर्गत कुरबुरीचे काय..!

chhagan bhujbal
chhagan bhujbal

बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोलला गर्दी पण ती दर्दी होणार का?

येवला (नाशिक) : वर्षवर्ष कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादीची साथ सोबत करणाऱ्या येवला मतदारसंघात कधी कधी धनुष्याचा तीरही निशाण्यावर लागला आहे. मात्र २००४ पासून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ येथील आमदार झाले आणि सर्वत्र राष्ट्रवादीचा बोलबाला सुरू झाला. आता भुजबळ अडीच वर्षांपासून येथे नाही त्यामुळे नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक आणि जिल्हा परिषदेच्याही निवडणुकीत पक्षाची झालेली पिछेहाट सर्वश्रुत आहे. अर्थात यामागे पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीचे निमित्त देखील दुर्लक्षून चालणार नाही. अशा वातावरणात पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणारा हल्लाबोल किती गर्दी खेचेल या प्रश्नाचे उत्तर प्रदेश चिटणीस माणिकराव शिंदे व इतर सहकाऱ्यांच्या चोख नियोजनातून व खेचलेल्या गर्दीतून दिसून आले आहे. आगामी निवडणुकांच्या प्राश्वभूमिवर हल्लाबोलची रंगीत तालीम जिंकली यामुळे नेतेगण आपला बालेकिल्ला शाबूत असल्याचे तर्क लावत आहेत. मात्र या ताकदीला अंतर्गत गटबाजीचा स्पीडब्रेकर अन कुरबुरीचे लागलेले ग्रहण कधी सुटणार हा अनुत्तरीत प्रश्न आहे.

येवला म्हटलं की भुजबळांचा बालेकिल्ला..या बालेकिल्ल्यात येऊन पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार, पक्षाध्यक्ष शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि इतर नेते मंडळी काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र अजित पवारांनी मारलेली दांडी हिरमोड करणारी ठरली असली तरी या सभेला झालेली गर्दी राष्ट्रवादीचा उत्साह दुणावणारी ठरली आहे. थेट नगराध्यक्ष निवडणुकीत पक्षाला पाहवा लागलेला पराभव आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे यांना डावलून दिलेल्या उमेदवार या सर्व पार्श्वभूमीवर भुजबळांच्या अनुपस्थितीत पक्षात किती बंडाळी सुरू आहे हे येवलेकरांनी पाहिले होते. त्यामुळे भुजबळांच्या अनुपस्थितीत होणारी प्रमुख पक्षनेत्यांची ही सभा किती गर्दी खेचेल याकडेदेखील सर्वपक्षीयांचे लक्ष लागून होते. त्यातच काही पक्षातीलच प्रमुखांनी सभेला गर्दी होऊ नये यासाठीची फिल्डिंग लावल्याने आयोजकांचा सभा सुरू होईपर्यंत चांगलाच कस लागला होता मात्र बंडाळीत ही झालेले नियोजन व जमलेली गर्दी हेच चोख उत्तर ठरले आहे.

माणिकरावांचे वजन अजूनच वाढले!
भुजबळांच्या अनुपस्थितीत तसे राष्ट्रवादीचे येथील सगळी सूत्र प्रदेश चिटणीस माणिकराव शिंदे यांच्या हातात आहे. याशिवाय सहकार नेते अंबादास बनकर, भुजबळांचे येथील स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे व त्यांचे शिलेदार देखील पक्षाचा झेंडा फडकावत ठेवत आहे. नगराध्यक्ष पदासाठीचा झालेला पराभव आणि जिल्हा परिषदेला उमेदवारी देताना डावलल्याने नाराज झालेले शिंदे वेगळी भूमिका घेण्याच्या विचारात असताना थेट अजितदादांनी त्यांना फोन करून थोडं सबुरीने घ्या.. असा सल्ला दिला होता. हा शब्द प्रमाण मानून माणिकराव पक्षाची येथील धुरा सांभाळत असल्याने सहाजिकच या सभेच्या नियोजनाची जबाबदारी देखील त्यांच्याकडेच होती.संपूर्ण चोख नियोजन प्रचार व जमवलेली गर्दी यातून माणिकरावांनी विश्वास सार्थ ठरवत पक्षनेतृत्वासमोर आपले वजन निच्छितच वाढवले आहे. त्यामुळे या पुढील काळात येथील पक्षाच्या वाटचालीत माणिकराव यांची भूमिका नक्कीच उजवी ठरणार हे नक्की!

हल्लाबोल नव्हे...हि तर प्रचारसभा
लोकसभा-विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने राष्ट्रवादीची ही जणू प्रचार मोहिमेत असल्याचे वक्त्यांच्या भाषणातून जाणवले. त्यामुळे मागील तीन टर्मपासून ताब्यात असलेला हा मतदारसंघ या पुढील काळात काय निर्णय घेतो हे आता पक्षातील नेत्यांवरच अवलंबून राहणार आहे. मागील तीन वर्षांत येथील विकासकामे पुर्णता ठप्प झाली आहे. असे असताना पक्ष म्हणून ही नेते मंडळी जनतेचा किती विश्वास संपादन करण्यात यशस्वी होतात यावरही बरेच काही अवलंबून आहे. त्यातही पक्षातील प्रमुखांचे तीन दिशेला तीन चेहरे असे चित्र असल्याने या पुढील काळात जमवून घेतले तर सर्वांचेच हित आहे. नाही तर वाटचाल सोपी नाही हेही तितकेच खरे..!

राजकीय भूमिका संदिग्ध या सभेत सुळे, तटकरे, आव्हाड, मुंडे, जयंत पाटील या सर्वांनीच भुजबळांना वेगळ्या वेगळ्या उपमा देऊन तोंड भरून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यामुळे येवलेकरांचे मन जिंकण्यात ही नेते मंडळी यशस्वीही झाली. सुळे यांनी तर पुन्हा भुजबळांचा प्रचार करायलाच येथे येऊ असेही जाहीर करून पुढील राजकीय भूमिका अधिकच संदिग्ध करून टाकली. मात्र असे असले तरी येथील गटबाजीचे वास्तव ऐकून ही मंडळीही सुन्न झाल्याचे समजते. या सर्व परिस्थितीचा विचार करता पक्षामागे गर्दी होत असली तरी ती दर्दी ठरविण्यासाठी भुजबळांच्या शिलेदारांसह शिंदे -बनकर यांची भूमिका नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे. नाही तर आगामी निवडणुकात संघर्ष अटळ आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com