अम्मी वो देखो शिवाजी महाराज... लघुपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद

संतोष विंचू
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

यु-ट्यूबवर हिंदू मुस्लिम ऐक्याच्या संदेशाचा बोलबाला,येवल्याच्या युवकाची निर्मिती 

येवला : मुळात उत्सवप्रिय असलेल्या या गावाने कलेच्या क्षेत्रात आपली गुणवत्ता नेहमीच सिद्ध केली आहे. याचा प्रत्यय नवी पिढीही देऊ लागली आहे. येथील हौशी फोटोग्राफर संजीव सोनवणे यांनी आपल्या कल्पकतेने युट्यूब वर येवल्याला सातासमुद्रापार नेले आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याच्या संदेश देणारा 'अम्मी वो देखो शिवाजी महाराज...' हा देखणा लघुपट त्यांनी तयार केला आहे. अवघ्या आठ दिवसांत या लघुपटाला युट्युबवर ४७ हजार प्रेक्षकांनी दाद दिली असून, हिंदू मुस्लिम एकतेच्या संदेशाचे कौतुक केले जात आहे.

काहीतरी वेगळे पण दर्जेदार करण्याची आवड असल्याने हा सामजिक विषय निवडून त्यांनी लाखमोलाचा संदेश दिला आहे. नम्रता फिल्मचे दिगदर्शक सोनवणे यांनी 'मला शिवाजी व्हायचंय' हा लघुपट करण्यापूर्वी मागील महिन्यात त्यांनी 'वंदे मातरम' तसेच त्याअगोदर 'नियती', 'येवल्याची परंपरा' अशा अनेक फिल्म तयार करून समाज प्रबोधन केले आहे.

हा ७ मिनिट २१ सेकंदाचा असलेला मार्मिक लघुपट करण्यापूर्वी त्यांनी मुस्लिम मोहल्यात ऊर्दू पुस्तकात शिवाजी महाराजांचा धड्याचा अभ्यास करताना पहिले आणि त्यांना या लघुपटाची संकल्पना सुचली. संहिता, मांडणी व कलाकार याचे दर्जेदार मांडणीसाठी तयारी केली, आणि एक पूर्ण दिवस शहरातील मुस्लिम व हिंदू बांधवाना सोबत घेऊन याचे चित्रीकरण मोमीनपुरा, पक्की मशीद व कोर्ट जवळची दर्गा या ठिकाणी पूर्ण केले.

या लघुपटाचे कथानक मनाला भावणारे आहे. यात एक मुस्लिम मुलींच्या परिवारावर काही गुंडाचा प्राणघातक हल्ला होतो. मुकी असलेल्या या मुलीला वडिलांचे छत्र गमवावे लागते. पुढे मुलीला उर्दू मधील शिवाजी महारांज्यांच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांची आवड निर्माण होते. एक दिवस ती मुलगी व आई दर्ग्यावर जातात. त्या ठिकाणी तिचे अपहरण करण्यासाठी काही गुंड येतात, आणि तितक्यात समोर तिला एक युवक शिवाजी महाराजाच्या रुपात मदतीला येताना दिसतो आणि मुकी असलेली हि मुलगी बोलू लागते. . . अम्मी वो देखो शिवाजी महाराज! शिवाजी महाराज नावाची ताकद व सलोखा दाखवतांना हे नाव किती प्रेरणादायी आहे असा संदेश या लघुपटातून मिळत आहे.

दहा दिवसात गाठली पन्नाशी
https://www. youtube. com/watch?v=H1aAoQb3Rxs या लिंकवर हा लघुपट यु-ट्यूबवर २२ ऑगस्टला सोनवणे यांनी अपलोड केला. त्यानंतर याचा बोलबाला इतका काही गाजतोय कि बुधवार पर्यत ३१ हजार जणांनी तो पहिला तर आज सायंकाळ पर्यत हाच आकडा ४७ हजार झाला आहे. हा रेकॉर्ड ब्रेक प्रतिसादाने सोनवणेच नाही तर येवलेकर देखील हुरळून गेले आहे. यात मुख्य भूमिकेत रिद्धी पहिलवान, सीमा पहिलवान, दत्ता शिंदे हे तर प्रतीक कुक्कर, हेमंत माळोकर, पीयूष पहिलवान, गणि शेख, इमरान पठाण, भूषण वडे, शुभम काळगे, नितीन लाड, चेतन धसे, वैभव खेरुड, ऋषीकेश सोनवणे, यांनी भूमिका केली आहे.

“शहरातील उर्दू स्कूल मध्ये कामानिमित्ताने गेलो असता चौथीच्या इतिहासाच्या उर्दूच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा इतिहास पाहून मला खूप आनंद झाला. सर्व मुस्लिम मुली ते वाचत असताना पाहून शिवाजी महारांजाच्या प्रति त्यां विद्याथीनिचे प्रेम, आपुलकी, आकर्षण पाहून मला ही कथा सुचली. या फिल्मचे एका दिवसात चित्रीकरण केले गेले असून कलाकारांना कोणताही अनुभव नसतानाही त्यांनी दर्जेदार काम केले आहे. ”
- संजीव सोनवणे, दिग्दर्शक

Web Title: nashik news yevala popular short film ammi woh dekho shivaji maharaj