कृतिशिल आराखड्याद्वारे राज्यातील प्रश्‍नांचे शोधू उत्तर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

नाशिक - तरुणांमधील वाढते नैराश्‍य, भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम, बेरोजगारीचे वाढते प्रमाण, व्यसनाधीनतेपासून सध्या जातीय स्तरावर समाजात फूट पाडण्याचा होत असलेला प्रयत्न या समस्या राज्याच्या विकासात गतिरोधक ठरत आहेत. राज्यस्तरावर उद्‌भविणाऱ्या या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी कृतिशील आराखडा तयार करण्यावर "सकाळ'च्या "यंग इस्पिरेटर्स नेटवर्क'च्या (यिन) मंत्रिमंडळाच्या बैठकीत भर देण्यात आला. शेतकरी आत्महत्या व असुरक्षितता यांसारख्या संवेदनशील विषय हाताळतांना सुदृढ समाज घडविण्यासाठी येत्या वर्षभरात विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार मंत्री मंडळातर्फे व्यक्‍त करण्यात आला.

शपथ विधीनंतर "यिन'च्या मंत्री मंडळाच्या पहिल्या तीनदिवसीय बैठकीला आजपासून गिरणारे गावातील जी. पी. फार्म येथील सभागृहात सुरवात झाली. उद्‌घाटन जी. पी. फार्मचे अध्यक्ष गंगाधर अमिन, व्यवस्थापकीय संचालक गीत आमिन यांच्या हस्ते झाले. या वेळी "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, "यिन'चे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी, "सकाळ'चे युनिट व्यवस्थापक राजेश पाटील आदी उपस्थित होते.

तरुणांमधील सामाजिक जाणीव जागृत ठेवतांना राजकीय मंडळीकडून युवाशक्‍तीचा गैरवापर होणार नाही, यासाठी तरुणाईने जागृत असावे, असे या वेळी निश्‍चित करण्यात आले. श्रीमंत माने म्हणाले, 'सध्या देशात बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर होत असतांना दर वर्षी सुमारे एक कोटी सुशिक्षित बेरोजगार निर्माण होत आहेत. अशात बरोजगारांना रोजगार देण्याचे आव्हान राजकीय पक्षांपुढे असेल. "यिन'च्या मंत्रिमंडळाने या तीनदिवसीय बैठकीत विचारमंथन करून सामाज व्यवस्था चांगली करण्यासाठी योगदान द्यावे.''

प्रास्ताविक तेजस गुजराथी यांनी केले. उपस्थितांचे स्वागत युनिट व्यवस्थापक राजेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन "यिन'चे जिल्हा समन्वयक गणेश जगदाळे यांनी केले. दरम्यान, दुपारच्या सत्रात "सकाळ'च्या जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा यांनी युवकांशी संवाद साधतांना त्यांना प्रोत्साहित केले. "यिन'चे मुख्यमंत्री तेजस पाटील यांनी मंत्रिमंडळ सदस्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.

युवकांनी आतला आवाज जागृत ठेवत स्वत:शी प्रश्‍न विचारत राहायला हवे. निराशेच्या प्रसंगात प्रेरणायी ठरतील असे रोल मॉडेल प्रत्येकाच्या जीवनात असावे.
- गीत आमिन, जी. पी. फार्मचे व्यवस्थापकीय संचालक

राष्ट्रविकासाची जबाबदारी तरुणांवर आहे. अशा तरुणांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये. शहर, राज्य, देश स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येकाने आपल्या जीवनात कर्तृत्वातून स्वत:ला सिद्ध करतांना अपेक्षित धेय प्राप्त करावे.
- गंगाधर आमिन, जी. पी. फार्मचे अध्यक्ष

रोजगाराभिमुख, सशक्‍त तरुण घडवा, यासाठी अभिनव उपक्रमांमध्ये संस्थेचा सहभाग असतो. युवकांच्या विकासासाठी "यिन' उत्तम व्यासपीठ आहे.
- कल्याणी सपकाळ, उपाध्यक्षा, कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट.

शपथविधीनंतर मंत्रिमंडळ सदस्यांमध्ये उत्साह आहे. युवकांसाठी उपयुक्‍त उपक्रम, धोरण ठरविण्यावर भर असेल.
- नंदकुमार गायकवाड, उपमुख्यमंत्री

बेरोजगारीचा प्रश्‍न लक्षात घेता, उपक्रम राबविण्याची गरज आहे. जॉब फेअर असेल किंवा औद्योगिक कंपनीला अभ्यास भेटीतून युवकांना प्रोत्साहित करत रोजगारक्षम बनविण्यासाठी उपक्रम हाती घेतला जावा.
- सानिका जगदाळे, सदस्य.

Web Title: nashik news yin meeting