कृतिशील आराखड्याद्वारे राज्यातील प्रश्‍नांचे उत्तर शोधू 

कृतिशील आराखड्याद्वारे राज्यातील प्रश्‍नांचे उत्तर शोधू 

नाशिक - तरुणांमधील वाढते नैराश्‍य, भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम, बेरोजगारीचे वाढते प्रमाण, व्यसनाधीनतेपासून सध्या जातीय स्तरावर समाजात फूट पाडण्याचा होत असलेला प्रयत्न, या समस्या राज्याच्या विकासात गतिरोधक ठरताहेत. राज्यस्तरावर उद्‌भवणाऱ्या या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी कृतिशील आराखडा तयार करण्यावर "सकाळ'च्या "यंग इस्पिरेटर्स नेटवर्क'(यिन)च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता. 16) भर देण्यात आला. शेतकरी आत्महत्या व असुरक्षितता यांसारखे संवेदनशील विषय हाताळताना सुदृढ समाज घडविण्यासाठी येत्या वर्षभरात विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार मंत्रिमंडळातर्फे व्यक्‍त करण्यात आला. 

शपथविधीनंतर "यिन'च्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या तीनदिवसीय बैठकीला मंगळवार(ता. 16)पासून गिरणारे गावातील जी. पी. फार्म येथील सभागृहात सुरवात झाली. जी. पी. फार्मचे अध्यक्ष गंगाधर अमिन, व्यवस्थापकीय संचालक गीत अमिन यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, "यिन'चे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी, "सकाळ'चे युनिट व्यवस्थापक राजेश पाटील आदी उपस्थित होते. 

तरुणांमधील सामाजिक जाणीव जागृत ठेवताना राजकीय मंडळींकडून युवाशक्‍तीचा गैरवापर होणार नाही, यासाठी तरुणाईने जागृत असावे, असे या वेळी निश्‍चित करण्यात आले. "यिन'तर्फे होणाऱ्या समर समीटमध्ये युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कुठल्या विषयांचा समावेश असावा, या संदर्भात विशेष सत्रात चर्चा झाली. 

श्री. माने म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या निकालातून युवाशक्‍तीची जाणीव झाली होती. सध्या देशात बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर होत असताना दर वर्षी सुमारे एक कोटी सुशिक्षित बेरोजगार निर्माण होताहेत. बेरोजगारांना रोजगार देण्याचे आव्हान राजकीय पक्षांपुढे असेल. युवकांमधून निवडून आलेल्या व तरुणाईचे प्रतिनिधित्व करत असलेल्या "यिन'च्या मंत्रिमंडळावर मोठी जबाबदारी आहे. या तीनदिवसीय बैठकीत विचारमंथन करून समाजव्यवस्था चांगली करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

तेजस गुजराथी यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, की शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक होत असताना सहभागींनी असाच उत्साह वर्षभर ठेवावा. तरुणांसाठी उपयुक्‍त उपक्रमांचा फायदा जास्तीत जास्त युवकांना होईल यासाठी प्रयत्न करावा. युनिट व्यवस्थापक राजेश पाटील यांनी स्वागत केले. "यिन'चे जिल्हा समन्वयक गणेश जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. 

दरम्यान, दुपारच्या सत्रात "सकाळ'च्या जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा यांनी युवकांशी संवाद साधताना त्यांना प्रोत्साहित केले. "यिन'चे मुख्यमंत्री तेजस पाटील यांनी मंत्रिमंडळ सदस्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. 

क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांवर चर्चा 
मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या विविध सत्रांत युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. "यिन फेटिव्हल'चे संयोजन, क्रीडा स्पर्धा, एकांकिका आदी स्पर्धांतून तरुणाईला व्यासपीठ उपलब्ध करण्याचे निश्‍चित करण्यात आले. 

स्वतःवर विश्‍वास ठेवा,  समस्या सुटेल - गीत अमिन 
प्रत्येकाच्या जीवनात येणाऱ्या अडथळ्यांचे स्वरूप कदाचित वेगळे असेल, पण प्रत्येकाच्या आयुष्यात अडथळे येतातच. अशा परिस्थितीत स्वत-वर विश्‍वास ठेवल्यास मोठ्यात मोठ्या समस्या सहज सुटू शकतील, असे मत जी. पी. फार्मचे व्यवस्थापकीय संचालक गीत अमिन यांनी व्यक्‍त केले. ते म्हणाले, की युवकांनी आतला आवाज जागृत ठेवत स्वतःशी प्रश्‍न विचारत राहायला हवे. निराशेच्या प्रसंगात प्रेरणादायी ठरतील असे रोल मॉडेल प्रत्येकाच्या जीवनात असावे, असे त्यांनी नमूद केले. 

कर्तृत्वातून स्वतःला  करा सिद्ध - गंगाधर अमिन  
राष्ट्रविकासाची जबाबदारी तरुणांवर आहे. अशा तरुणांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये. शहर, राज्य, देश स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येकाने आपल्या जीवनात कर्तृत्वातून स्वत-ला सिद्ध करताना अपेक्षित ध्येय प्राप्त करावे, असे आवाहन जी. पी. फार्मचे अध्यक्ष गंगाधर अमिन यांनी केले. कॅन्टीनच्या सुरवातीच्या प्रवासापासून यशस्वी व्यावसायिकतेपर्यंतचा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. 

युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असते. रोजगाराभिमुख, सशक्‍त तरुण घडवा यासाठी अभिनव उपक्रमांत संस्थेचा सहभाग असतो. युवकांच्या विकासासाठी "यिन' उत्तम व्यासपीठ असून, त्यास सर्वतोपरी सहकार्य असते. 
- कल्याणी सपकाळ,  उपाध्यक्षा, कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट 

शपथविधीनंतर मंत्रिमंडळ सदस्यांत उत्साह आहे. तीनदिवसीय बैठकीला सुरवात झाली असून, बैठकीतून युवकांसाठी उपयुक्‍त उपक्रम, धोरण ठरविण्यावर भर असेल. 
- नंदकुमार गायकवाड, उपमुख्यमंत्री 

बेरोजगारीचा प्रश्‍न लक्षात घेता, उपक्रम राबविण्याची गरज आहे. जॉब फेअर असेल किंवा औद्योगिक कंपनीला अभ्यासभेटीतून युवकांना प्रोत्साहित करत रोजगारक्षम बनविण्यासाठी उपक्रम हाती घेतला जावा. 
- सानिका जगदाळे, सदस्य 

मंत्रिमंडळाच्या वर्षभराच्या नियोजनासाठी ही बैठक होत आहे. बैठकीत समाजोपयोगी व तरुणांसाठी जे काही काम करता येतील, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. कौशल्य विकासावर आधारित तरुणांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेत आहोत. 
- तेजस पाटील, मुख्यमंत्री 

मंत्रिमंडळ सदस्य म्हणाले... 
पंकज भिवरे - निवडून आलेला प्रत्येक प्रतिनिधी इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. इतर जिल्ह्यांत कार्यक्रम घेत इतरांनाही प्रेरित करू शकतो. सोबतच स्वतःचा आत्मविश्‍वासदेखील वाढवू शकतो. 

आल्फिया चाफेकर - बेरोजगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता, या प्रश्‍नावर काम करण्याची इच्छा आहे. "यिन'च्या माध्यमातून जॉब फेअर घेऊन युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. 

राधिका घोरपडे - उभरत्या युवा कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. "यिन'च्या व्यासपीठावर त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मंत्रिमंडळात या संदर्भात मुद्दा मांडला. 

भावना बिरारी - सॉफ्ट स्किलशी निगडित प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिल्यास त्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल. हाच मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला आहे. 

श्रुती गोडबोले ः सध्याची अभ्यासपद्धती ही पुस्तकी अभ्यासावर आधारित आहे. पुस्तकांतील ज्ञान महत्त्वाचे आहे. सोबत औद्योगिक भेटीतून प्रात्यक्षिक ज्ञानदेखील मिळू शकते. 

प्रवीण कोल्हे - युवकांना कायदेविषयक मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांचे हक्‍क, जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यासाठी असा उपक्रम मार्गदर्शक ठरू शकतो. 

लतेश वाळके - मंत्रिमंडळाची पहिली बैठक असल्याने सर्वांमध्ये उत्साह आहे. असाच उत्साह पुढील वर्षभर ठेवताना युवकांशी संबंधित प्रश्‍नांवर आम्ही सर्व काम करणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com