सोळावर्षीय युवकांकडून सामाजिक बांधिलकीचा ‘प्रयास’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

नाशिक - तरुणाईला त्यांच्यातील क्षमतांची ओळख करून देत, आयुष्य घडविण्यासाठी ‘सकाळ’तर्फे ‘यंग इस्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) हे युवा व्यासपीठ खुले करून देण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या ‘यिन’च्या शिबिरातून प्रेरित होऊन येथील पंधरा-सोळावर्षीय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन प्रयास फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. शिक्षण व पर्यावरणासंदर्भातील उपक्रमांसाठी कार्य करणारी ही संस्था कार्यरत आहे.

नाशिक - तरुणाईला त्यांच्यातील क्षमतांची ओळख करून देत, आयुष्य घडविण्यासाठी ‘सकाळ’तर्फे ‘यंग इस्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) हे युवा व्यासपीठ खुले करून देण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या ‘यिन’च्या शिबिरातून प्रेरित होऊन येथील पंधरा-सोळावर्षीय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन प्रयास फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. शिक्षण व पर्यावरणासंदर्भातील उपक्रमांसाठी कार्य करणारी ही संस्था कार्यरत आहे.

मे महिनाअखेरीस ‘यिन’चे समर यूथ समीट अंजनेरी येथील सपकाळ नॉलेज हबमध्ये झाले होते. जिल्हाभरातून तरुणाईने या शिबिरात सहभाग नोंदविला होता. शिबिरात एकत्र आलेल्या पंधरा-सोळावर्षीय विद्यार्थ्यांनी ‘यिन’चे व्यासपीठ अधिकाधिक युवकांपर्यंत पोचविण्याचे ठरविले.  सामाजिक कार्य करण्याच्या धडपडीतून जूनपासूनच स्वयंसेवी संस्था स्थापनेची प्रक्रिया सुरू केली. दुसरीकडे, सामाजिक उपक्रम सुरू ठेवले. सध्या स्वयंसेवी संस्थेच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. संस्थापक संकेत राजोळे, रेणुका कुलकर्णी, तन्मय वामने, आशिष आवारे, अरिहंत शिंदे, ओंकार गोतीसे, तेजस सोनार, अथर्व सोनार, ज्ञानेश्‍वर खरात यांचा मुख्य कार्यकारिणीत समावेश आहे. संस्थेशी अन्य स्वयंसेवकदेखील जोडले गेले आहेत.

वेगवेगळ्या विद्याशाखांतून शिक्षण घेत करिअर घडविण्याची धडपड करत असलेल्या या युवकांकडून सामाजिक कार्यासही तितक्‍याच धडाडीने सुरवात करण्यात आली. काही दिवसांपूर्वी ‘एनजीओ’तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. पर्यावरण व शिक्षण या दोन क्षेत्रांत संस्था कार्य करत आहे. पर्यावरणाच्या अनुषंगाने ‘नमामि गोदा’ या उपक्रमात स्वयंसेवकांनी सहभागी होत गोदा स्वच्छतेत हातभार लावला होता. त्यासाठी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांचे मार्गदर्शन प्राप्त केले. दुसरीकडे, शिक्षणक्षेत्रात कार्यरत असताना ‘नेटवर्क फॉर यूथ’चे डॉ. राम गुडगिला यांच्यासोबत संस्था काम करते आहे. मुलांना प्रेरणा देण्यासाठी आणि नवीन ऊर्जा देण्यासाठी नेटवर्क फॉर यूथ व प्रयास फाउंडेशन कार्यरत आहे.

 ‘चेंज फॉर बेटरमेंट’ या कार्यक्रमाचे सध्या नियोजन सुरू असून, या माध्यमातून नाशिकच्या युवकांना कला, पर्यावरण, शिक्षण, प्रशासकीय, राजकारण, विधी आदी क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. यिन समर यूथ समीटमध्ये इटलीच्या अल्बर्टो आयोरे यांचेही मार्गदर्शन लाभले होते. त्यांच्याशी सातत्याने संपर्कात राहत या युवकांनी ‘एनजीओ’चे सल्लागार म्हणून अल्बर्टो यांचे सहकार्य घेत आहेत. 

लघुपट निर्मितीचे प्रयत्न
व्हाइटनरचा वापर करत नशा करणाऱ्या मुलांना वाचविण्यासाठी संस्थेतर्फे लघुपट निर्मितीचे काम सुरू आहे. या माध्यमातून व्यसनाधीनतेपासून लहान मुलांना वाचविण्याचा सामाजिक संदेश दिला जाणार आहे.

‘यिन’च्या शिबिरातून प्रोत्साहित होऊन आम्ही संस्थेची स्थापना केली. अभ्यास सांभाळून पर्यावरण, शिक्षण या विषयावर आम्ही सामाजिक कार्य करीत आहोत.
- संकेत राजोळे