बेरोजगारीमुळे भारतातील तरुण नैराश्‍यग्रस्त

दीपिका वाघ
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नाशिक - वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अभ्यासानुसार ३६ टक्के लोकसंख्या ही नैराश्‍यग्रस्त अवस्थेला तोंड देत आहे. आपण स्वाइन फ्लू, डेंगीबद्दल बरंच बोलतो, पण मानसिक आजाराबद्दल फारसं बोलत नाही. आयुष्यात एकदा तरी अशी वेळ येते जेव्हा माणूस मानसिक आजाराने ग्रस्त असतो.

नाशिक - वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अभ्यासानुसार ३६ टक्के लोकसंख्या ही नैराश्‍यग्रस्त अवस्थेला तोंड देत आहे. आपण स्वाइन फ्लू, डेंगीबद्दल बरंच बोलतो, पण मानसिक आजाराबद्दल फारसं बोलत नाही. आयुष्यात एकदा तरी अशी वेळ येते जेव्हा माणूस मानसिक आजाराने ग्रस्त असतो.

भारतात तरुणांची लोकसंख्या सर्वाधिक आहे, पण त्यांच्या समस्या तेवढ्याच गंभीर आहेत. नैराश्‍यापोटी आत्महत्या करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिक्षण आहे, पण नोकरी नाही. नोकरी आहे, पण घराची जबाबदार घेता येईल तेवढा पैसा नाही. नोकरीत सुरक्षितता नाही. सततच्या असुरक्षित वातावरणामुळे तरुणांमध्ये नैराश्‍याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे चित्र आहे. 

सततच्या बेरोजगारीमुळे तरुण अनैतिक मार्गाने पैसे कमावण्याकडे तरी वळतो किंवा व्यसनाधीनतेच्या आहारी तरी जातो. भरमसाट शुल्क भरून तरुण शिक्षण घेतो. साहजिकच त्यानंतर नोकरीची अपेक्षा मोठी असते, पण सुरवातीच्या काळात कंपनीकडून मोफत काम करून घेणे, कमी वेतन यांसारखी अपेक्षा असल्यामुळे भविष्याबाबत तरुण सतत चिंताग्रस्त अवस्थेत जगत असतो. शहरी भागाच्या तुलनेने ग्रामीण भागात तर भयावह स्थिती आहे. शेतकरी कुटुंब, शिक्षण जेमतेम, अपुरा पैसा यामुळे ग्रामीण भागातील मुलांचा लग्नाचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कार्यालयांत चालणारी गटबाजी, घरात सुख-सोयी आहेत, पण घरी आल्यावर कोणी ऐकणारं नाही, प्रेमभंग, विश्‍वासघात या सर्व गोष्टी नैराश्‍याला कारणीभूत ठरताहेत.

मुलांच्या तुलनेने मुलींचे प्रमाण अधिक
भारतीय परंपरेनुसार सर्वसामान्य कुटुंबातील मुलीवर दोन घरांची जबाबदारी येते. शिक्षण घेतल्यानंतर करिअर आणि लग्न या गोष्टींबाबत ती द्विधा मनस्थितीत असते. शिक्षण झाल्यावर आई-वडील लग्नाचा विचार करतात. त्यामुळे त्वरित नोकरी मिळाली नाही तर लग्न एवढाच पर्याय तिच्यासमोर राहतो. करिअर आणि घर सांभाळताना कार्यालय व घराची जबाबदारी पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्यास ती नैराश्‍यग्रस्त होते. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने करिअरच्या सुरवातीच्या काळात नैराश्‍यात गेल्याची कबुली दिली होती.

‘कंडक्‍ट डिसऑर्डर’चे प्रमाण चिंताजनक 
मुलांमध्ये खोटे बोलणे, जिद्द करून मारायला धावणे, व्यसने करणे इत्यादी अवगुण असतील, तर त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवा! कारण असे वागणे म्हणजे कंडक्‍ट डिसऑर्डर असू शकते. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या मानसिक आजाराचे प्रमाण भारतात ९.२ टक्के आहे, असे बेंगळुरूच्या ‘निमहंस’च्या (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेन्टल हेल्थ अँड न्यूरो सायन्स) संशोधनात आढळून आले आहे. या संदर्भात मानसोपचारतज्ज्ञांनी पालकांना सबुरीचा सल्ला दिला आहे. जिद्दी, रागीट मुलांवर वेळीच सकारात्मक वर्तन पद्धतीचे उपचार करणे आवश्‍यक आहे, त्याकडे दुर्लक्ष केल्यास मुले मानसिक आजाराची शिकार होऊ शकतात.

नोकरीअभावी आर्थिकदृष्ट्या परावलंबित्व येते. न्यूनंगड निर्माण होतो. यामुळे तरुणाई योग्य मार्ग निवडू शकत नाही. अनेक दिवस बेरोजगार राहिल्यास अनैतिक गोष्टींचा आधार घेऊन पैसा कमावण्याचा मार्ग निवडण्याची शक्‍यता असते. नोकरी ही कायमस्वरूपी असतेच असे नाही. याउलट छोटा-मोठा व्यवसाय नक्की करता येऊ शकतो. त्यासाठी प्रयत्नशील राहिल्यास त्रास नक्कीच कमी होऊ शकतो. 
- डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचारतज्ज्ञ