एक कोटी रुपयांचा पाऊस पाडणाऱ्या मांत्रिकासह टोळी गजाआड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

आडगाव पोलिसांची छापा टाकून कारवाई

आडगाव पोलिसांची छापा टाकून कारवाई

नाशिक : औरंगाबाद रोडवरील वाहनबाजार चालविणाऱ्या देव मोटर्सच्या कार्यालयातच गुरुवारी (ता. 24) मध्यरात्री 1 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्यासाठीचा मांत्रिकाचा डाव आडगाव पोलिसांनी छापा टाकून उधळून लावला. यावेळी एक मांत्रिक पसार झाला असून दुसऱ्या मांत्रिकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक अडचणीमुळे गंडाविलेल्या जात असलेल्या महिलेच्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्यासाठी मांत्रिकाने एका कुमारिकेला आणण्याची गळ घातली होती. वेळीच पोलिसांना घटनेची खबर मिळाल्याने कुमारिके संशयितांच्या कृत्यापासून बचावली आहे. दरम्यान, संशयितांनी यापूर्वीही असे कृत्य केले असण्याची शक्‍यता असून त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.

प्रमोद बापू सूर्यवंशी (36, रा. जागृतीनगर, सायट्रिक कंपनी रोड, राजराजेश्‍वर मंगल कार्यालयाजवळ, जेलरोड), सुधीर दत्तू भोसले (34, रा. रोकडोबावाडी, देवळाली गाव), तुषार नरेंद्र चौधरी (40, रा. साईबाबानगर, सिडको), संदीप सीताराम वाकडे (35, रा. भुजबळ फार्म, सप्तशृंगी चौक, एसआय दवाखान्याच्या पाठीमागे, सिडको), चंद्रकांत राघोजी जेजुरकर (48, रा. पाथरवटलेन, शिवाजी चौक, पंचवटी) यांना अटक करण्यात आली आहे तर एक निखिल नावाचा मांत्रिक घटनास्थळावरून पसार झाला.

आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांना काल (ता.24) रात्री औरंगाबाद रोडवरील देव मोटर्स या ठिकाणी अघोरी पूजाविधी सुरू असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, आडगाव पोलिसांनी सापळा रचून मध्यरात्रीच्या सुमारास संशयित प्रमोद बापू सूर्यवंशी याच्या देव मोटर्स या वाहन बाजाराच्या कार्यालयावर छापा टाकला. त्यावेळी सहा संशयित हे अघोरी पुजाविधी करताना दिसून आले. संशयित निखिल नावाचा मांत्रिक पोलिसांच्या तावडीतून पसार होण्यात यशस्वी झाला तर उर्वरित सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या (रा. नालासोपारा वेस्ट, जि. पालघर) फिर्यादीनुसार जादूटोणा विरोधी कायदा व फसवणूक याप्रकरणी दोघा मांत्रिकांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, सहाय्यक निरीक्षक काकासाहेब पाटील, उपनिरीक्षक सचिन सदाफुले, हवालदार देवराम वनवे, नाजीम शेख, बोराडे, लखन, यशवंत गांगुर्डे, केदारे, मिथून गायकवाड, खांडेकर, जोंधळे यांच्या पथकाने बजावली.

पैशांच्या पाऊस पाडण्यासाठी कुमारिकेची होती अट
पीडित महिलेवर 10 लाख रुपयांचे कर्ज झाले होते. त्याच विवंचनेतून तिने संशयित प्रमोद सूर्यवंशी यास फोन केला असता, त्याने पैशांचा पाऊस पाडणाऱ्या मांत्रिकाची माहिती दिली. मांत्रिक पैशांचा पाऊस पाडून 1 कोटी रुपये देईल. त्यासाठी त्यास 60 हजार रुपये द्यावे लागतील आणि पूजाविधीसाठी एक कुमारिका पाहिजे अशीही माहिती संशयित सूर्यवंशी याने दिली. त्याप्रमाणे पीडित महिला काल रात्री 11 वाजेच्या सुमारास नाशिकरोड येथे आली. संशयित सूर्यवंशी याच्याकडे महिलेने 30 हजार रुपये आगाऊ दिले आणि उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले. त्यानंतर कुमारिकेला घेऊन संशयित व महिला हे औरंगाबाद रोडवरील देवा मोटार्स या वाहनबाजाराच्या कार्यालयात आले. त्यासाठी मांत्रिक संदीप वाकडे आणि निखिल यांनी लिंबु, तांब्या, हळद-कुंकू, आंब्याची पाने, अंडे, हिरवा कापडा, पांढरी साडी, पांढऱ्या बांगड्या, पैंजन, कानातील झुबे, नेलपॉलिश, नारळ, पेढे, अत्तर, विड्या, बिंदी, अगरबत्ती असे पूजासाहित्य मांडलेले होते. सदरची पूजा सुरू असतानाच आडगाव पोलिसांनी छापा टाकला.

Web Title: nashik police arrested exorcist and gang