‘मैत्रेय’चा पैसा ‘एस्क्रो’तून ठेवीदारांच्या खात्यात

nashik success story
nashik success story

दामदुप्पट योजनांचे आमिष दाखवून सर्वसामान्यांच्या आर्थिक पुंजीवर डल्ला मारण्याचे प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढले. मुदतीत गुंतविलेले पैसे परत न मिळाल्यानंतर गुंतवणूकदाराला आपली फसगत झाल्याची जाणीव होते. यास अपवाद ठरली ती ‘मैत्रेय’ची केस. तत्कालीन पोलिस आयुक्तांनी आपल्या अनुभवाचा कल्पक वापर करून मैत्रेय कंपनीला कायद्याच्या कचाट्यात आणले आणि गुंतवणूकदारांना त्यांची हक्काची रक्कम देण्यास भाग पाडले. जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्य अन्‌ देशातील हे एकमेव ऐतिहासिक उदाहरण तपासाच्या दृष्टीने पुढे आले आहे. 

जानेवारी २०१६ च्या अखेरच्या आठवड्यात होलाराम कॉलनीतील मैत्रेय प्लॉटर्स कंपनीच्या कार्यालयाची गुंतवणूकदारांनी तोडफोड केली. या प्रकारामुळे मैत्रेय कंपनीत जादा व्याजदाराच्या आमिषाने ठराविक मुदतीसाठी पैसे गुंतविलेले ठेवीदार जागे झाले. अनेकांच्या मुदतठेवीच्या रकमेची मुदत संपली, तरी पैसे मिळत नव्हते. कंपनीकडून दिले जाणारे धनादेश वठत नसल्याने ठेवीदार हवालदिल झाल्याने अखेर तत्कालीन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करून घेतानाच दुसरीकडे आर्थिक गुन्हे शाखेला मैत्रेय कंपनीच्या मुंबईतील मुख्य कार्यालयावर छापा टाकायला रवाना केले. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने रातोरात मुंबईतील कार्यालयावर छापा टाकून मुख्य सर्व्हरसह डाटा आणि कंपनीच्या संचालक वर्षा सत्पाळकर यांना अटक करून नाशिकला आणले. 

सुरवातीलच्या काळात पोलिसांकडे तक्रारी करण्यासाठी ठेवीदार येत नव्हते, तर दुसरीकडे न्यायालयाच्या आवारात मैत्रेय कंपनीच्या संचालक वर्षा सत्पाळकर यांच्या समर्थनार्थ ठेवीदार उपस्थित राहत होते. त्यामुळे दुहेरी पेचात पोलिस सापडण्याची शक्‍यता होती; परंतु या प्रकरणात न्यायालयात सरकारी पक्षाने अभ्यासपूर्वक माहिती न्यायालयासमोर मांडली. परिणामी त्यातून कंपनीने राज्यासह देशभरातील सुमारे २० लाख ठेवीदारांकडून २१०० कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले. नाशिक शहर व जिल्ह्यातून तक्रारींची ओघ वाढला तसा फसवणुकीचाही आकडा वाढत गेला. कंपनीने प्रारंभी दाखल तक्रारींची रक्कम देण्यासाठी आराखडा सादर केला; परंतु तत्कालीन पोलिस आयुक्त जगन्नाथन यांनी आपल्या अनुभव व अभ्यासाच्या बळावर आराखड्याची मांडणी फेटाळून लावत न्यायालयाकडे पैसे जमा करण्यासाठी ‘एस्क्रो’ खात्याची मागणी केली. न्यायालयानेही त्यास मान्यता दिली. परिणामी कंपनीला या खात्यावर टप्प्याटप्प्याने पैसे टाकण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com