अल्पवयीन बहिणींचा विवाह रोखला

त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील ३ आठवड्यांतील तिसरी घटना
Minor sister marriage
Minor sister marriageSakal

नाशिक - एकात्मिक बालविकास विभाग, पोलिस यंत्रणा बालविवाह रोखत आहे याची कुणकूण लागल्याने मंगळवारी (ता.१९) विवाहाचा मांडव उतरवला. पण गुपचूप दोन अल्पवयीन बहिणींचा विवाह लावून दिला जाणार असल्याची माहिती मिळाल्याने बालविकासच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामविकासाच्या सहकार्याने हा बालविवाह रोखण्यात यश मिळवले. ही घटना देवगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील आहे. त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात ३ आठवड्यात बालविवाह रोखण्याची ही तिसरी घटना आहे. २५ मार्चला दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीसह तिच्या कुटुंबीयांची समजूत घालत एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी भारती गेजगे यांनी बालविवाह रोखला होता. त्यानंतर १७ एप्रिलला घोटी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रद्धा गंधहास आणि गेजगे यांनी दुसरा बालविवाह रोखला. देवगावमध्ये दोन बहिणींचा बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्याने गेजगे यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना विवाह होणाऱ्या कुटुंबाकडे पाठवले. ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य दिले. बहिणींचा एकाच मांडवात बालविवाह होत असलेल्या एकीचा जन्म २००६ आणि दुसरीचा जन्म २००७ मधील आहे. या दोघींच्या थोरल्या बहिणींचा विवाह झाला आहे.

गरिबी अन्‌ शिक्षणाचा अभाव...

गरिबीमुळे कुटुंबातील माता कामाला जाते. शिवाय शिक्षणाअभावी अल्पवयात विवाह केल्याने पुढील पिढ्यांमध्ये तयार होणाऱ्या प्रश्‍नांची कल्पना नाही. त्याचवेळी मुलींची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी कुटुंबीय उत्सुक होते. त्यामुळे बालविवाह करणार नाही, असे लेखी देण्यासाठी कुटुंबीय तयार नव्हते. आमचे फोटो कशाला घेता? असा जाब कर्मचाऱ्यांना विचारला जात होता. त्यातून वादाची ठिणगी पडली. पण कर्मचारी बालविवाह होऊ देणार नाही यावर ठाम होते. अखेर गेजगे आणि कुटुंबीयांचे भ्रमणध्वनीवरून संवाद साधण्यात आला. त्यावेळी गेजगे यांनी मुलींचा विवाह वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय करायचा नाही अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा निर्वाणीचा इशारा दिला. त्यामुळे कुटुंबीयांनी दोन्ही बहिणींचा विवाह न करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com