donating kidney to her husband family after her husband death
donating kidney to her husband family after her husband death

Women's Day : पतीला किडनी दान करणारी आधुनिक सावित्री

हिंमत न हारता संसाराचा गाडा सांभाळून करताहेत ज्ञानदानाचे कार्य

ओझर : पतीला स्वतःची किडनी दान करणाऱ्या आणि पतीच्या निधनानंतरही न डगमता संसाराचा गाडा सांभाळून ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या ओझरच्या कांचनमाला हुजरे यांना आधुनिक युगातील सावित्रीच म्हणावे लागेल. निफाड तालुक्यातील कारसूळ जनता विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती हुजरे यांच्या जिद्दीची कहाणी तितकीच प्रेरणादायी आहे.

आयुष्यात प्रत्येक स्त्रीला संकटांचा सामना करावा लागतो. संकटावर मात करण्याची क्षमता स्त्रीमध्येच जास्त असते. असेच काहीसे कांचनमाला हुजरे यांच्या आयुष्यात घडले. माहेर ओझर आणि सासर निंबाळे (मनमाड). कांचनमाला यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. पंधरा-वीस लोकांचे एकत्रित कुटुंब. घरातून चांगले संस्कार केले गेले. कुटुंब जोडून ठेवणे ही शिकवण कुटुंबातूनच मिळाली. बी. ए. (इंग्रजी) पर्यंत शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर घरात लग्नाची बोलणी सुरू असताना विनोद पाटील यांच्याशी ९ मे २००१ मध्ये विवाह झाला. कुटुंबाचा वेल बहरत असताना संसाराच्या वेलीवर मुलगी ‘सारा’ आणि मुलगा ‘नील’ ही अपत्ये झाली. सुखी संसार चालू असताना नियतीने मोठे संकट उभे केले. मुलगा दहा महिन्यांचा असतानाच पतीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

वडील खंडेराव हुजरे यांनी धीर देत विनोद यांच्यावर उपचार सुरू केले. त्यांची परिस्थिती बघून त्यांच्या मुलांचे आणि भविष्याचे काय, याचा विचार करून शिक्षणात नऊ वर्षांचे अंतर असताना कांचनमाला यांनी दुःख बाजूला ठेवून पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. बी. एड. पूर्ण केले. त्यानंतर पतीवर किडनी प्रत्यारोपण करण्याचे ठरले. त्यात अनंत अडचणी आल्या. किडनीदाता मिळत नसल्याने कांचनमाला यांनी हिमतीने स्वतःची किडनी देण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद येथे पतीवर किडनी प्रत्यारोपण झाले, शस्त्रक्रिया यशस्वीही झाली. पतीच्या प्रकृतीत सुधारणादेखील झाली. दोन महिन्यांत घरी जायचे ठरल्याने सर्वांमध्ये उत्साह होता. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पतीला इन्फेक्शन झाले, डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले; परंतु यश आले नाही. त्यातच पती विनोद पाटील यांचे निधन झाले.

वडील कांचनमाला यांना माहेरी ओझर येथे घेऊन आले. जिल्ह्यातील प्रमुख शिक्षण संस्था असलेल्या ‘मविप्र’मध्ये उपशिक्षिका म्हणून त्या रुजू झाल्या. त्यानंतर पुन्हा दुःखाने घाव घातला. भाऊ सचिन हुजरे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यातूनही सावरत त्या उभ्या राहिल्या. वडील, आजी, वहिनी, भाऊ, माहेरचे नातेवाईक, सर्व मित्रपरिवाराच्या सहकार्याने कांचनमाला आज मुलांसाठी खंबीरपणे उभ्या आहेत. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी ती पेलण्याची ताकद निर्माण करून चेहऱ्यावर हसू ठेवून त्या जीवन जगत आहेत. कुसुमाग्रजांच्या ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा’ या ‘कणा’ कवितेची प्रेरणा घेत कांचनमाला आपल्या संसाराचा रथ सांभाळून ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.

''जीवनात आलेल्या संकटाचा सामना करावा लागला. मात्र, त्यावर मात करून मुलांच्या भविष्यासाठी संघर्ष सुरू आहे. ‘जीवन एक खेल है, इसे अवश्‍य खेले’ या उक्तीप्रमाणे वाटचाल सुरू आहे.''

- कांचनमाला हुजरे, प्रभारी मुख्याध्यापिका, कारसूळ विद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com