राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकहाती सत्तेचा विश्‍वास 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. तरीपण सत्तेसाठी राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. "नंबर वन' राष्ट्रवादी की शिवसेना, याचा निकाल गुरुवार (ता. 23)च्या मतमोजणीतून लागणार आहे. पण राष्ट्रवादीने एकहाती सत्तेचा विश्‍वास व्यक्त केला आहे. त्याच वेळी शिवसेनेने सत्तेसाठी कोणाच्याही कुबड्यांची गरज भासणार नसल्याचा दावा केला आहे. 

शेतकरी युतीला शिकवतील धडा 
केंद्र आणि राज्यातील भाजप व शिवसेनेच्या सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, कांद्याचे दर वर्षभरापासून कोसळलेले आहेत. तरीही सरकार याबाबत कुठलीही उपाययोजना करीत नसल्यामुळे सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. शेतकऱ्यांनी या निवडणुकीत सरकारला मतदानातून धडा शिकविला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता येणार, असा आमचा विश्‍वास आहे. 
-ऍड. रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

शिवसेनेला मतदारांकडून चांगला प्रतिसाद 
शिवसेनेच्या उमेदवारांना मतदारांनी दिलेला प्रतिसाद अतिशय चांगला आहे. त्यामुळे सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, हरसूल, नाशिक तालुका या नाशिक लोकसभा मतदारसंघातील कार्यक्षेत्रात शिवसेनेची एकहाती सत्ता येईल. सत्तास्थापनेसाठी कुणाच्या कुबड्या घेण्याची आम्हाला वेळ येईल असे वाटत नाही. 
-विजय करंजकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना 

सत्तेसाठी कॉंग्रेस राहील निर्णायक 
राज्यातील अन्य जिल्हा परिषदांसह नाशिकमध्येही कॉंग्रेस आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. चांगल्या आणि लोकोपयोगी कामांच्या जोरावर या वेळीही पक्ष जिल्हा परिषदेत चांगल्या जागा मिळवेल. एवढेच नव्हे, तर जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी कॉंग्रेस निर्णायक राहील. 
-राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस 

भाजपला मिळेल चांगले यश 
भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चांगले यश मिळेल. आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने पक्षाला चांगली कामगिरी करता आल्याचे समाधान आहे. पहिल्यांदा सर्वत्र उमेदवार दिले आहेत. त्यामुळे निकालात पक्षाला घवघवीत मतदान झाल्याचे चित्र पाहावयास मिळेल. 
-दादा जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप