गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 1260 वाहनांची विक्री! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

जळगाव - गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत वस्तू खरेदी भारतीय संस्कृतीची एक भाग झाली आहे. त्यानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्यालाही अनेकांनी खरेदी करीत मुहूर्त साधला. या मुहूर्तावर बुकिंग केलेली वाहने आज घरी नेण्यात आली. यामुळे आज शहरातील शोरूममधून एक हजार 260 वाहने नेण्यात आली. 

जळगाव - गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत वस्तू खरेदी भारतीय संस्कृतीची एक भाग झाली आहे. त्यानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्यालाही अनेकांनी खरेदी करीत मुहूर्त साधला. या मुहूर्तावर बुकिंग केलेली वाहने आज घरी नेण्यात आली. यामुळे आज शहरातील शोरूममधून एक हजार 260 वाहने नेण्यात आली. 

हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासोबत गुढीपाडव्याचा मुहूर्त असल्याने वस्तू खरेदीसह सोने- चांदीची मौल्यवान दागिने खरेदीची संधी अनेकांनी साधली. प्रामुख्याने दसरा- दिवाळीला होणाऱ्या उलढालीप्रमाणे गुढीपाडव्यालादेखील मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यामुळे सणांच्या दिवशी बाजारपेठेत खरेदी- विक्रीत मोठा उच्चांक गाठला जातो. इतकेच नाही, तर नवीन घराचे स्वप्न साकार करण्यासाठी पगारातील काही हिस्सा जतन करून किंवा बॅंकेतून कर्ज काढून घर विकत घेतले जाते. कष्टाच्या पैशांनी विकत घेतलेल्या घरात प्रवेश करण्यासाठीदेखील मुहूर्तास महत्त्व दिले जाते. यामुळेच मराठी नववर्ष गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत अनेकांनी गृहप्रवेश केला. 

नवीन गाडीवर अनेकांची स्वारी 
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करायचे म्हणून टू व्हीलर, फोर व्हीलर शोरूममध्ये सुरवातीपासूनच बुकिंग सुरू होती. शोरूममधील बुकिंगची संख्या सुमारे दीड हजारापेक्षा अधिक होती. यापैकी एक हजार 260 वाहने आज देण्यात आली. सातपुडा ऑटोमोबाइल्स, मानराज मोटर्स, फोकस ह्युंदाई, राम होंडा, पगारिया ऑटो, पंकज ऑटो, महिंद्रा सातपुडा, पंकज ऑटोमोबाइल्स्‌, श्रेयांस ऑटो या फोर व्हीलर, टू व्हीलरच्या शोरूममधून वाहने नेण्यात आली. यातच वाहनांवर विविध सवलती असल्याने त्याचा लाभदेखील खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळाला. 

इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंसह मोबाईल खरेदीवर भर 
मुहूर्तावर कूलर, एसी, टीव्ही, फ्रीज अशा विविध इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंचीही खरेदी करण्यावर भर होता. याशिवाय, आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी आज मोबाईलची खरेदी करण्यावरदेखील भर होता. यामुळे गुढीपाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर मोबाईल बाजारात खरेदीदारांची गर्दी होत असून, लाखो रुपयांची उलाढाल मोबाईल खरेदीतून झाली. "ऍन्ड्राइड'च्या जमान्यात दहा ते पंधरा हजारांचा मोबाईल खरेदीकडे अधिक कल होता.

Web Title: new 1260 vehicles on gudhipadwa