'पाणी, रस्ते, भूमिगत गटारींसह हागणदारीमुक्तीस देणार प्राधान्य'

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 24 मे 2018

"ग्रामस्थांत आपल्या कामाबाबत समाधान असून कडक उन्हाळ्यातही दर तिसऱ्या, चौथ्या दिवशी गावाला पाणीपुरवठा केला जात आहे."
- साधना विजय राणे, सरपंच, निजामपूर

'माझं गाव, माझं व्हिजन'
सौ. साधना विजय राणे, सरपंच, निजामपूर ता. साक्री जि. धुळे.

निजामपूर-जैताणे (धुळे) : फेब्रुवारी २०१७ मध्ये निजामपूर (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ११ विरुद्ध ६ मतांनी साधना विजय राणे यांची निवड झाली. त्यानंतर उपसरपंचपदी अनिता विशाल मोहने यांची निवड झाली. त्यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य, क्वालिटी सोशल ग्रुप व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने गावाच्या विकासासाठी वाटचाल सुरू केली. पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, क्वालिटी सोशल ग्रुपचे अध्यक्ष मिलिंद भार्गव, सदस्य महेश राणे, परेश वाणी, जाकीर तांबोळी आदींच्या सहकार्याने यशस्वी वाटचाल सुरू आहे.

परंतु विकासकामे करत असताना त्यांना अनेक अडचणींचाही सामना करावा लागला. अडचणींवर मात करत गावाची पाणीसमस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून एक कोटी पंधरा लाखाचा निधी मंजूर केला. याकामी पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सहकार्य लाभले. त्या निधीतून बुराई प्रकल्पापासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी दुरुस्ती व तेथून पुढे गावापर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. जुनी जीर्ण झालेली पाण्याची टाकी काढून नवीन एक लाख नव्वद हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. नवीन विजपंप बसविण्यात येणार आहेत.

चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून इंदिरानगर बेघर वस्तीसाठी नकट्या बंधाऱ्याजवळ विहीर खोदून पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. फक्त कनेक्शन बाकी आहे. त्यामुळे तेथील अल्पसंख्य, आदिवासींच्या पाण्याची समस्या सुटली आहे. २५:१५ योजनेतील मंजूर २० लाख रुपये निधीतून गावात विकासकामे सुरू आहेत. २५ लाखांची इतर कामेही मंजूर आहेत. सिमेंटचे रस्ते, भूमिगत गटारी व दुरुस्ती, चिंचचौकात व प्रभाग क्रमांक दोनमध्ये पेव्हर ब्लॉक, एलईडी बल्ब, हायमॅक्स बसविणे, भिल्ल वस्तीजवळ संरक्षक भिंतीचे बांधकाम, सफाई कामगारांसाठी निवासस्थानांची दुरुस्ती, दमदमा चौकात स्वच्छता गृह , काँक्रीटीकरण, शौचालये बांधणे आदी कामे कॉलनीसह गावात प्रगतीपथावर आहेत. राहिलेल्या वॉर्डांतही ही कामे होणार आहेत.

खासदार डॉ. हिना गावित यांच्या निधीतून व महेंद्र वाणी यांच्या सहकार्याने गावात ६ हायमॅक्स दिवे बसविण्यात आले आहेत. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील 'प्लॅन प्लस' मधील कामे सुरू आहेत. पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे यांच्या सहकार्याने दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ९ लाख रुपये निधीतून स्त्री शौचालये बांधली. त्यातूनच हायमॅक्स दिवे बसविणेही प्रस्तावित आहे. शौचालय अनुदान योजनेंतर्गत आतापर्यंत गावातील सुमारे १८० लाभार्थ्यांना त्याचा लाभ देवून हागणदारीमुक्त चळवळीस बळ दिले आहे.

Web Title: nijampru gram panchayat sarpanch sadhana rane vision