जैताणे आरोग्य केंद्रात सुविधांबाबत नाराजी, डॉक्टरांवर ग्रामस्थांचा अरेरावीचा आरोप...

प्रा. भगवान जगदाळे
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) - माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील आरोग्य केंद्रात रुग्णांसह ग्रामस्थांना अजूनही पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसून येथे केवळ एकच पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मात्र केवळ नावालाच असून ते नियमितपणे रुग्णालयात उपस्थित राहत नसल्याचा आरोपही संतप्त ग्रामस्थांनी यावेळी केला. रुग्णांसाठी शौचालये नाहीत. रुग्णवाहिका नाही. शवविच्छेदन गृह व शस्रक्रिया गृहाची दुरावस्था झाली आहे. पाण्याच्या टाकीची दुरावस्था आहे. ड्रेनेजची असुविधा आहे.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) - माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील आरोग्य केंद्रात रुग्णांसह ग्रामस्थांना अजूनही पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसून येथे केवळ एकच पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मात्र केवळ नावालाच असून ते नियमितपणे रुग्णालयात उपस्थित राहत नसल्याचा आरोपही संतप्त ग्रामस्थांनी यावेळी केला. रुग्णांसाठी शौचालये नाहीत. रुग्णवाहिका नाही. शवविच्छेदन गृह व शस्रक्रिया गृहाची दुरावस्था झाली आहे. पाण्याच्या टाकीची दुरावस्था आहे. ड्रेनेजची असुविधा आहे. आरोग्य केंद्राची इमारत व निवासस्थानांचीही दुरावस्था झाली आहे. ड्रेनेजची असुविधा आहे. पुरेसा औषधसाठा व पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. 2008 पासून मंजूर ग्रामीण रुग्णालय जागेच्या वादामुळे केवळ कागदावरच आहे. आदी असुविधा आहेत...

डॉक्टरांवर अरेरावीचा आरोप...
दरम्यान आज सकाळपासूनच रुग्णालयात सुमारे दीडशेवर रुग्ण उपचारासाठी उपस्थित असताना येथील डॉक्टर मात्र अकरा वाजता उपस्थित झाले. याचा जाब विचारला असता वैद्यकीय अधिकारी डॉ. वळवी यांनी मात्र आम्हाला दमदाटी करून अरेरावीची भाषा वापरली. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते सदा महाजन, कमलेश माळी, मेघराज पैठणकर, श्रीकांत खलाणे, भाऊसाहेब भदाणे, जगदीश बच्छाव, रवींद्र जाधव, तुकाराम सोनवणे, सोनू माळी आदींनी केला.

यासंदर्भात यापूर्वी स्थानिक प्रशासनासह सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार व आरोग्य मंत्री आदींशी संपर्क करण्यात आला असून यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासनही लोकप्रतिनिधींनी दिल्याचे या युवकांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

*ग्रामस्थांनी सहकार्य करावे - डॉ. वळवी...
आरोग्य केंद्रात प्रत्येक जण तावातावाने येऊन आमच्यावर प्रश्नांचा भडिमार करतो. त्यामुळे रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविण्यात अडचणी येतात व वेळेचाही अपव्यय होतो. कोणाची काहीही अडचण असल्यास रीतसर व सनदशीर मार्गाने मांडावी. रुग्णालयाला पुरेशा सुविधा व पुरेसा कर्मचारी वर्ग मिळणेसंदर्भात वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असून रुग्णांनी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. जी. वळवी यांनी केले आहे.