आता इंग्रजीची प्रश्नपत्रिका नव्हे तर कृतीपत्रिका - प्रवीण अहिरे

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) - बदलत्या काळानुसार अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदलणेही गरजेचे असून विद्यार्थी केंद्रित शिक्षण पध्दतीत ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना भाषा विषयांचे आकलन सुलभ व्हावे म्हणून ह्यावर्षी अकरावी तर पुढील वर्षापासून बारावीच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात बदल करण्यात आला असून आता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेऐवजी कृतीपत्रिका दिली जाईल असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी केले.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) - बदलत्या काळानुसार अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदलणेही गरजेचे असून विद्यार्थी केंद्रित शिक्षण पध्दतीत ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना भाषा विषयांचे आकलन सुलभ व्हावे म्हणून ह्यावर्षी अकरावी तर पुढील वर्षापासून बारावीच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात बदल करण्यात आला असून आता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेऐवजी कृतीपत्रिका दिली जाईल असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी केले. धुळे येथील विद्यावर्धिनी कनिष्ठ महाविद्यालयात नाशिक विभागीय शिक्षण मंडळातर्फे आयोजित इंग्रजीच्या दोन दिवसीय (ता.13 & 14) प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

संस्थेचे चेअरमन डॉ. दिलीप पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे सेक्रेटरी व खजिनदार युवराज करनकाळ, संचालक व समन्वयक प्रा. एम. एल. पाटील शिक्षण विस्तार अधिकारी श्री. दुसाने, प्राचार्य डॉ. डी. एस. सूर्यवंशी, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. बी. ए. पाटील, विषयतज्ञ प्रा. विजय पाटील (धरणगाव), प्रा. राजेंद्र अग्रवाल (साक्री), प्रा. अविनाश पाटील (अमळनेर), प्रा. जोगेश शेलार (चोपडा), प्रा. नेरकर (लोणखेडा), प्रा. हाडपे (चोपडा) आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन झाले.

धुळ्यासह, साक्री, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ. दिलीप पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आधुनिक काळात प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजीचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांनीही स्वतःला अद्ययावत ठेवावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही फार मोठी गुणवत्ता आहे. ती ओळखणेही गरजेचे आहे. उदघाटनानंतर साक्री व शिरपूर तालुक्यातील शिक्षकांचा एक गट तर धुळे व  शिंदखेडा तालुक्यातील शिक्षकांचा दुसरा गट तयार करण्यात येऊन सकाळी अकरापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे प्रशिक्षण देण्यात आले.

दरम्यान मराठी व हिंदी विषयांच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे एकदिवसीय प्रशिक्षणही धुळे येथीलच एसएसव्हीपीएस महाविद्यालयात घेण्यात आले. दरम्यान नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव वाय. पी. निकम यांनीही प्रशिक्षणादरम्यान भेट देत प्रशिक्षणार्थी शिक्षकांशी हितगुज केले. प्रा. बबिता वाडीले यांनी सूत्रसंचालन केले. इंग्रजीच्या प्रशिक्षणास सुमारे दोनशे शिक्षक उपस्थित होते.

दोन विषय शिकविणाऱ्या शिक्षकांमध्ये उपस्थितीबाबत संभ्रम...
काही शिक्षक हे मराठी व इंग्रजी आदी दोन विषय मिळून पूर्णवेळ आहेत. त्यांच्यात मात्र उपस्थितीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. नेमकं कोणत्या विषयाच्या प्रशिक्षणासाठी उपस्थित रहावे असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यातील काही शिक्षक मराठी तर काही शिक्षक इंग्रजीच्या प्रशिक्षणास उपस्थित होते. दोन विषय शिकविणारे जे शिक्षक आज मराठीच्या प्रशिक्षणास उपस्थित होते त्यांनी उद्या इंग्रजीच्या प्रशिक्षणास उपस्थित रहावे असे आवाहन नाशिक बोर्डाचे सहसचिव वाय. पी. निकम यांनी केले आहे.