खडसे- महाजन गटबाजीने निवडणूक "वाऱ्यावर' 

खडसे- महाजन गटबाजीने निवडणूक "वाऱ्यावर' 

खडसे- महाजन गटबाजीने निवडणूक "वाऱ्यावर' 


जळगाव, ता. 19 : माजीमंत्री एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील राज्याला सर्वश्रुत असलेल्या गटबाजीमुळे शिक्षक मतदारसंघाची निवडणूकही भाजप कार्यकर्त्यांनी "वाऱ्यावर' सोडली आहे. राज्य मंत्रिमंडळात महसूलखाते असलेले क्रमांक दोनचे मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालक चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित मेळाव्यास शिक्षक, कार्यकर्त्यांनी फिरवलेली पाठ ही भाजपच्या अंतर्गत गटबाजीतील द्योतक मानले जात आहे. या स्थितीमुळे भाजप उमेदवार अनिकेत पाटील मात्र "ऑक्‍सीजन'वर आहे. 

खडसे- महाजन गटबाजीचे पडसाद 
एरवी विरोधात असताना कोणतीही निवडणूक अथवा आंदोलन गांभीर्याने घेणाऱ्या जळगाव जिल्हा भाजपत या निवडणुकीनिमित्ताने अगदीच सामसूम आहे. गेल्या काही वर्षांपासून खडसे- महाजन यांच्यातील वादात जिल्ह्यातील भाजपत उभी फूट पडली आहे. त्याचे परिणाम या निवडणुकीवरही उमटत आहे. नाही म्हणायला दोघांनी त्यांच्या मतदारसंघांत संपर्क, मेळावे घेतले असले तरी जिल्हा पातळीवर कोणतीही हालचाल मात्र नाही. 

उमेदवार बाहेरचा मग... 
भाजपकडून कॉंग्रेसनेते माजीमंत्री विजय नवल पाटील यांचे पुत्र अनिकेत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्तेही नाराज असून उमेदवार आपला नाहीच तर काम कशाला करायचे, या भूमिकेत ते आहे. जिल्हाध्यक्ष या प्रक्रियेपासून अलिप्तच असल्याचे दिसून येते. 


राष्ट्रवादीतही सामसूम 
भाजपप्रमाणेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही या निवडणुकीबाबत उत्सुकता नाही. जिल्ह्यात एकमेव आमदार असलेले जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील निवडणुकीच्या प्रचारापासून अलिप्त आहे. पक्षाचे जिल्ह्यातील नेते ईश्‍वरलाल जैन, माजीमंत्री गुलाबराव देवकर ही मंडळीही फारशी सक्रिय नाही. जिल्ह्यातील उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीतही या निवडणुकीच्या हालचाली बेतानेच होताना दिसत आहेत. 

पालकमंत्र्यांच्या मेळाव्याकडे पाठ 
गेल्या आठवड्यात या निवडणुकीसाठी राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा झाला होता. मात्र, या मेळाव्यास पाटलांच्या मर्जीतील पाच-सात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशिवाय दुसरे कुणी नव्हते. खडसे, महाजन मेळाव्याला आलेच नाहीत. जिल्हाध्यक्ष उदय वाघ उशिरा पोचले, तर त्यांच्या पत्नी आमदार स्मिता वाघ मेळावा संपण्याच्या वेळेस दाखल झाल्या. अर्धातास प्रतीक्षा केल्यानंतर काही कार्यकर्ते जमले व मर्यादित संख्येतच मेळावा उरकावा लागला. 

नको सफारी, नको पैठणी... 
सर्वाधिक शिक्षक मतदार असलेल्या नाशिक, नगर भागात केवळ पैठण्यांचाच नव्हे तर सफारी ड्रेसचा वर्षाव सुरू झाला आहे. त्याचा धसका घेतलेल्या काही सर्वसाधारण उमेदवारांनी "नको सफारी, नको पैठणी, आम्हाला हवाय आमच्या हक्‍काचा शिक्षक आमदार', अशा आशयाचा प्रचार सोशल मीडियावरून सुरू केला आहे. या निवडणुकीत काही आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांकडून मतदार शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या पैठण्यांसोबत सफारी ड्रेस दिले जात असल्यामुळे वैशिष्टपूर्ण ठरत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com