सामाजिक समतेचे स्वप्न साहित्यातून साकार - हजारे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे सामाजिक समतेचे स्वप्न पाहिले ते डॉ. गंगाधर पानतावणे यांनी आपल्या वैचारिक साहित्यातून व कृतीतून साकार केले आहे. आजच्या समाजाला डॉ. पानतावणे यांच्यासारख्या सात्विक माणसांची नितांत गरज आहे. त्यांचे जीवन समाजाला आधार आहे, अशी माणसे टिकली पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी येथे केले. 

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे सामाजिक समतेचे स्वप्न पाहिले ते डॉ. गंगाधर पानतावणे यांनी आपल्या वैचारिक साहित्यातून व कृतीतून साकार केले आहे. आजच्या समाजाला डॉ. पानतावणे यांच्यासारख्या सात्विक माणसांची नितांत गरज आहे. त्यांचे जीवन समाजाला आधार आहे, अशी माणसे टिकली पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी येथे केले. 

डॉ. गंगाधर पानतावणे यांनी आज वयाची ऐंशी वर्षे पूर्ण झाल्यानिमित मनमाड शहर नागरी सत्कार समितीतर्फे त्यांचा नागरी सत्कार व अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. या प्रसंगी लोककवी वामनदादा कर्डक विचारपीठावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. गंगाधर आहिरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब कुशारे आदी उपस्थित होते. आठवले व अण्णा हजारे यांच्या हस्ते डॉ. पानतावणे यांना महावस्त्र, सन्मानचिन्ह, मानपत्र देत नागरी सत्कार करण्यात आला. 

सांस्कृतिक दहशतवाद थांबवा : डॉ. पानतावणे 
सत्काराला उत्तर देताना डॉ. पानतावणे म्हणाले, की नवा समाज नवा माणूस उभा करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून केले. साहित्य हे प्रबोधनाचे माध्यम असले पाहिजे. साहित्य क्षेत्रात क्रांतीचे विज्ञान निर्माण होणे गरजेचे आहे. डॉ. बाबसाहेबांनीदेखील साहित्याचा गहन अभ्यास केला होता. त्यामुळे ते म्हणत की माणसाचे प्रबोधन करणारे त्याच्या जीवनाला गती देणारे साहित्य पाहिजे. त्यांनी रंजनवादी साहित्याचा पुरस्कार केला नाही. साहित्य प्रबोधनाचे माध्यम असले पाहिजे. मूल्यात्मक जाणिवा साहित्यात असल्या पाहिजे, ही भूमिका त्यांनी मांडली. हीच भूमिका घेऊन "अस्मितादर्श'ने गेली 50 वर्षे वाटचाल केली; मात्र डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची होणारी विटंबना व विकृतीकरण हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचे नमूद करून तो थांबविण्यासाठी तरुण लेखक, अभ्यासकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

"पद्मश्री'साठी पाठपुरवा करणार : आठवले 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा "अस्मितादर्श' नियतकालिकांमधून निष्ठेने पुढे नेत दलित साहित्यात साहित्यिकांची एक नवी पिढी घडविण्याचे काम डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केले आहे. आयुष्यभर आंबेडकरी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या डॉ. पानतावणे यांना "पद्मश्री' सन्मान मिळावा, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी येथे सांगितले.