'ड्रोन' असूनही बिबट्याला पकडण्यात अपयश!

leopard
leopard

पिलखोड(ता. चाळीसगाव), ता. 24 : वन विभागातर्फे 'ड्रोन'च्या साहाय्याने गिरणा परिसरात आठवड्याभरापासून शोध घेतला जात आहे. मात्र, त्याचा कुठलाच मागमूस लागत नसल्याने वन विभागाला वारंवार अपयश येत आहे. एवढा मोठा फौजफाटा शिवारात फिरवूनही हाती काहीच येत नसल्याने ग्रामस्थ कमालीचे हैराण झाले आहेत. त्यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर साशंकता व्यक्त केला जात आहे.

 देशमुखवाडी शिवारात 11 नोव्हेंबरला बिबट्याने मुलाला ठार केले. त्यानंतर 15 नोव्हेंबरला वरखेडे शिवारात महिलेला ठार केले. या दोन घटना लागोपाठ घडल्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला होता. त्यानंतर वन विभाग वरखेडे, तिरपोळे व दरेगाव शिवारात आठवडाभर ठाण मांडून होते. या संपूर्ण भागात वन विभागाने 'ड्रोन'ने बिबट्याचा शोध घेतला. वरखेडे शिवारात बिबट्या ड्रोनमध्ये दिसला. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे बिबट्याने तेथून पोबारा केला.

काल(गुरुवार) दुपारी साडे तीनपासून वन विभाग आपला फौजफाटा घेऊन तामसवाडी शिवारात दाखल झाले होते. 'ड्रोन'ने शेत शिवार शोधण्यास सुरवात देखील केली. परंतु पदरी निराशा आली. ग्रामस्थांनी ज्या जंगल भागात बिबट असल्याचे सांगितले, त्याकडे दुर्लक्ष करत त्या भागात ड्रोन फिरवण्यास वन विभागाचे कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याचे  तामसवाडीच्या ग्रामस्थांनी सांगितले.

कुत्र्यामुळे महिला बचावली...

तामसवाडी गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर गुऱ्हाळ नाल्याकडे जाणाऱ्या शिवार रस्त्यावर नारायण त्र्यंबक पाटील यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात नाशिक जिह्यातल्या लखमापूर गावचे मेंढपाळ कुटुंब मेंढ्या चराईसाठी शेतात बसले होते. रात्री अकराच्या सुमारास नारायण पाटील हे शेतात गेले होते. मेंढपाळ कुटुंबियांशी बोलत शोकोटीजवळ शेकत बसलेले असताना त्या कुटुंबियातली एक महिला झोपली होती. त्या महिलेच्या शेजारी एक कुत्रा देखील होता. कुत्र्याने बिबट्याला पाहिल्यानंतर जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. त्यामुळे शेजारी शेकोटीजवळ बसलेले सर्व जण त्या दिशेने धावत गेले. तो बिबट असल्याचे कळताच त्यांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. तरी तो जागेवरून हालत नव्हता. अखेर सगळ्यांनी एकजुटीने त्याला हाकलले. महिलेच्या जवळ कुत्रा होता म्हणून त्या बचावल्या. त्यामुळे अनर्थ टळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com