सभापतींसह आठ जणांविरुद्ध "ऍट्रासिटी'चा गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

चाळीसगाव (जि. जळगाव) - येथील पंचायत समितीतील गटविकास अधिकारी (बीडीओ) मधुकर काशिनाथ वाघ यांनी गुरुवारी (ता. 2) आपल्या दालनात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेने गंभीर वळण घेतले असून, वाघ यांच्या जबाबावरून पंचायत समितीच्या सत्ताधारी भाजपचे सभापती, उपसभापती यांच्यासह आठ जणांविरोधात आज "ऍट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीने 32 जणांच्या जबाबाची उलट तपासणी केली आहे. 

"बीडीओ' वाघ यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून ते जबाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याने काल (ता. 4) रात्री उशिरा त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला. घटनेपूर्वी त्यांनी लिहिलेली "सुसाईड नोट' व आज दिलेल्या जबाबावरून पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, सभापतींचे पती व माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे, विद्यमान सदस्य कैलास निकम, सुनील पाटील, ग्रामसेवक संघटनेचे राज्य कोशाध्यक्ष व वडगाव लांबेचे ग्रामविस्तार अधिकारी संजीव निकम, पंचायत समितीतील कनिष्ठ प्रशासन अधिकारी के. बी. मालाजंगम, सहायक प्रशासन अधिकारी आर. डी. महिरे या आठ जणांविरोधात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार (ऍट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

"बीडीओ' वाघ यांनी घटनेपूर्वी लिहिलेली पाच पानी "सुसाईड नोट' व नंतर त्यांनी दिलेला प्रत्यक्ष जबाब याची पडताळणी करूनच पोलिस प्रशासनाने सभापतींसह आठ जणांवर गुन्हा नोंदविला आहे. 
- अरविंद पाटील, पोलिस उपअधीक्षक, चाळीसगाव