धो-धो पावसासाठी महादेवाला जलाभिषेक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

अंबासन - पावसाळा लागिसन महिना व्हयनां... सुरवातले पाऊस बरा पडना... असे वाटे या वरीसना पाऊसनं अवसान काय राही... अन्‌ काय नहीं... पाऊसना भरवसावर पैराई गय... अन्‌ पाऊसनी डोया लाई घिनात, असे केविलवाणे बोल सध्या काटवनसह मोसम परिसरात शेतकऱ्यांकडून कानावर पडत आहेत. धो धो पाऊस व्हावा, यासाठी महादेव मंदिरातील पिंड पाण्यात बुडवून ग्रामस्थ देवाला साकडे घालत आहेत. अनेक शेतकरी पिकांना वाचविण्यासाठी विहिरीतील जेमतेम पाणी देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

जून उलटून गेला तरी पाण्याचा टिपूस न पडल्याने काटवन व मोसम परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अनेक शेतकऱ्यांनी घरातील डागदागिने गहाण ठेवून पेरण्या केल्या. सुरवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, महिना उलटूनही पाऊस नसल्याने पिके कोलमडू लागली आहेत. अनेक शेतकरी विहिरीतील पाण्यावर पीक वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोणतेही संकट आले की देव पाण्यात बुडवून ठेवण्याची पद्धत प्रचलित आहे. करंजाड (ता. बागलाण) येथील नागरिकांकडून महादेव मंदिरात पूजा करण्यात आली असून, पिंड पाण्यात बुडवून आता तरी धो-धो पाऊस पाड, असे साकडे घातले आहेत. या वेळी सरपंच उज्ज्वला देवरे, पोलिसपाटील प्रवीण देवरे, केवळ देवरे, पोपट देवरे, दीपक वाघ, भास्कर देवरे, जितेश देवरे, महेश देवरे, धनंजय वाघ, पप्पू वनिस, नारायण वनिस, राजेंद्र देवरे, अरुण वनिस, गोरख देवरे, योगेश देवरे, सुनील सूर्यवंशी, भाऊराव पवार, नीलेश आहिरे, श्‍यामकांत शेवाळे, केदा देवरे उपस्थित होते.