लग्नासाठी जुने मोडून नवे दागिने खरेदीवर भर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

जळगाव - पंतप्रधानांनी पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका अलीकडेच सुरु झालेल्या लग्नसराईला बसला आहे. लग्न तोंडावर असताना हातात रोकड नसल्याने वर-वधूंसाठी दागिने घेण्याची पंचाईत होऊन बसली असून लग्नाघरची मंडळी आता घरातील जुने दागिने मोडून नवे करण्यावर भर देत असल्याचे चित्र समोर आले आहे. तर नोटाबंदीच्या या निर्णयामुळे रोखीने दागिने खरेदी करण्याचे प्रमाण थेट 20 टक्‍क्‍यांपर्यंत घटल्याने जळगावातील सुवर्ण बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे.

जळगाव - पंतप्रधानांनी पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका अलीकडेच सुरु झालेल्या लग्नसराईला बसला आहे. लग्न तोंडावर असताना हातात रोकड नसल्याने वर-वधूंसाठी दागिने घेण्याची पंचाईत होऊन बसली असून लग्नाघरची मंडळी आता घरातील जुने दागिने मोडून नवे करण्यावर भर देत असल्याचे चित्र समोर आले आहे. तर नोटाबंदीच्या या निर्णयामुळे रोखीने दागिने खरेदी करण्याचे प्रमाण थेट 20 टक्‍क्‍यांपर्यंत घटल्याने जळगावातील सुवर्ण बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या 8 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. जुन्या नोटा बदलणे, एटीएम व बॅंकखात्यातून रोख रक्कम काढण्यावर निर्बंध घातले. त्यामुळे विविध व्यावसायिक क्षेत्रावर या नोटाबंदीचा मोठा परिणाम झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बॅंकांमध्ये व बाहेर तसेच एटीएम केंद्रांवर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्या पंधरा दिवसांनंतर कुठे कमी होऊ लागल्यात. मात्र, अशातच 16 नोव्हेंबरपासून लग्नसराई सुरु झाल्यामुळे या निर्णयाचा फटका विवाह सोहळ्यांनाही बसला आहे.

दागिने खरेदीवर मोठा परिणाम
सोन्या-चांदीचे दागिने मुख्यत्वे रोख रकमेतून खरेदी करण्याची पद्धत होती. आतापर्यंत हीच रुढ पद्धत चालत आली होती. विशेष म्हणजे दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा चांगला पाऊस झाल्याने हंगाम समाधानकारक होता. त्यामुळे बाजारपेठेत तेजी निर्माण झाली होती. दिवाळीचे दिवस सरल्यानंतरही आठवडाभर सराफ बाजारात तेजी होती. त्यातून विक्रमी व्यवसाय झाल्याचे ज्वेलर्स सांगतात. मात्र, नोटाबंदी व रोख रक्कम काढण्यावरील निर्बंधांमुळे सर्वाधिक फटका सोने-चांदीच्या बाजाराला बसला आहे. दागिने खरेदी चेकने केली, तरी अशा मोठ्या व्यवहारांची चौकशी होऊ शकते म्हणून त्याला मर्यादा आहेत. रोखीने खरेदी करायला लोकांकडे हाती रोकड नाही, अशी स्थिती आहे.

जुने मोडून नवे करण्यावर भर
ज्यांच्या कुटुंबात लग्न आहे, अशा लग्नघरांची या निर्णयामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. अगदी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातही लग्नसोहळ्यात पाच-दहा लाखांपेक्षा अधिक खर्च होत असतो. त्यातील मोठा खर्च दागिन्यांवर होतो. मात्र, ज्यांच्याकडे विवाह आहे त्यांनाही बॅंकांमधून अडीच लाखापेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही, त्यामुळे लग्नघरांचीही मोठी पंचाईत झाली आहे. दागिन्यांवर पाच-दहा लाखांपेक्षा जास्त खर्च करायचा असेल तर तो कसा करणार? असा प्रश्‍न निर्माण झाल्याने काही कुटुंबीय घरातील जुने दागिने मोडून नवे दागिने घेण्यावर भर देत आहेत. त्यामुळे या व्यवहारांचे प्रमाण वाढल्याचे व्यावसायिक सांगतात.

लग्नसराई असली तरी नोटाबंदीच्या निर्णयामुळे सुवर्णबाजारातील उलाढाल ठप्प आहे. ज्यांच्याकडे लग्न आहे, त्यांच्या हाती कॅश नाही, त्यामुळे जुने दागिने मोडू नवे दागिने खरेदी केले जात आहेत. स्वाभाविकत: रोखीने होणारे व्यवहार घटले असून उलाढाल 20 टक्‍क्‍यांवर आली आहे. आणखी काही दिवस हीच स्थिती राहील, मात्र यामुळे व्यवसाय अडचणीत आला आहे.
- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव जिल्हा सराफ असोसिएशन.