वादळी पावसाने धुळ्याला एक कोटींचा तडाखा 

Loss-by-Rain
Loss-by-Rain

धुळे - शहरासह जिल्ह्याला शनिवारी पावसाने झोडपून काढले. पावसाच्या दमदार आगमनावेळी प्रचंड वादळी वाऱ्यामुळे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे अनुमान महसूल यंत्रणेसह वीज अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. सर्वाधिक 50 लाखांहून अधिक नुकसान वीज कंपनीला सहन करावे लागले. अनेक गावांचा वीजपुरवठा अद्यापही खंडित असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. 

शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी शनिवारी (ता. 2) सायंकाळी सातनंतर थरकाप उडविणारा विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने कहर केला. त्याने धुळे तालुक्‍यातील पूर्व आणि उत्तरेकडील भागाला सर्वाधिक तडाखा दिला. शहरालाही मोठी झळ सोसावी लागली. पाठोपाठ शिरपूर, शिंदखेडा तालुक्‍यांत नुकसान झाले. 

विविध प्रकारचे नुकसान
वृक्ष उन्मळून पडणे, पत्रे उडणे, घरांची पडझड होणे, विजेचे खांब पडणे, तारा तुटणे, जाहिरातीचे फलक वाकणे, शेतीत पाणी साचणे, बांध फुटणे, फळबागांना क्षती यासह विविध प्रकारचे नुकसान जिल्ह्याला सोसावे लागले. यात वरखेडी (ता. धुळे) शिवारात पावरा कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची चटका लावणारी घटना घडली. 

युद्धपातळीवर कामे सुरू 
रविवारी पहाटे पावसाने विश्रांती घेतल्यावर सरकारी यंत्रणा कामाला जुंपली. वरखेडीतील चौघांचा मृत्यू आणि या भागात सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आल्यावर पंचनाम्यास सुरवात झाली. यासह शहर, जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे महसूल यंत्रणेने सुरू केले. यंत्रणेच्या माहितीनुसार धुळे तालुक्‍यात 23 घरांची अंशतः पडझड, पत्रे उडून जाणे, आठ जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.   

वीज कंपनीला झोप नाही 
सर्वाधिक नुकसानीची झळ वीज कंपनीला सोसावी लागली. ठिकठिकाणी मिळून किमान तीनशेहून अधिक विजेचे खांब आडवे झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर ताराही तुटल्या आहेत. परिणामी, अनेक गावांत शनिवारपासून खंडित झालेला वीजपुरवठा अद्याप सुरू झालेला नाही. या स्थितीमुळे वीज कंपनीची झोप उडाली आहे. यंत्रणा वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी अहोरात्र कामात जुंपली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com