आधुनिक शेतीतून एक कोटी रुपयांचे उत्पन्न

One crore rupees income from modern farming
One crore rupees income from modern farming

सोनगीर(धुळे)- सतत तीन वर्षांपासून दुष्काळ, विहिरींना फारसे पाणी नाही. तुटपुंज्या पाण्यावर लावलेला भाजीपाल्याला बाजारात भाव नाही. अशा अवस्थेत पाण्याचे योग्य नियोजन करीत, शेतीला विज्ञान व आधुनिकतेची जोड देत निकुंभे ता. धुळे येथील संदीप हिंमतसिंग गिरासे या युवा शेतकर्‍याने चक्क एक कोटी रुपयांची शिमला मिरचीचे उत्पन्न घेतले असून 50 लाख रूपयांचा टरबूज घेतला आहे.

रमजानमुळे अकरा रुपये किलो असा दणकेबाज भाव टरबूजला मिळाला. बाराही महिने दररोज तीन सालदार व किमान 25 मजूर तेथे काम करीत असल्याने शेती नव्हे जणू एखादा उद्योग सुरू असल्याचे वाटते. वार्षिक निव्वळ नफा सव्वा कोटी रुपये आहे. संदीप गिरासे यांनी नोकरीच्या मागे न लागता बीएचे शिक्षण अर्धवट सोडून शेतीकडे लक्ष केंद्रित केले. त्यांची शेती करण्याची पध्दत, नियोजन, विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर सर्व थक्क करणारे असून  शेतकरी व नवयुवकांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. 

संदीप गिरासे भावासह शेती करतात. त्यांच्याकडे 70 एकर शेती असून 30 एकर गावाच्या उत्तरेला व 40 एकर दक्षिणेला वेगवेगळ्या दोन ठिकाणी आहे. एवढी शेती असून उत्पन्न मात्र जेमतेम मिळत होते. अशावेळी गिरासे यांनी शिक्षण सोडून शेतीकडे लक्ष केंद्रित केले. मागील चार-पाच वर्षापासून कधी अतिवृष्टी तर कधी कमी पावसाने परिसरातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. गिरासे यांनी 16 ट्यूबवेल केल्या पण उपयोग झाला नाही. पावसाच्या अनिश्चिततेवर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धतीचा वापर करणे आवश्यक होते.

परंपरागत पीक पद्धतीला फाटा देऊन पावसाची अनियमितता व वातावरणातील बदलाप्रमाणे नवीन पिके घेणे आवश्यक होते. म्हणून त्यांनी कमी पाण्यावर येणाऱ्या उमराण जातीचे बोरफळ घेतले. गुजरातेत विक्री केल्याने फायदा झाला. त्यातून त्यांनी त्यांच्या दक्षिणेकडील 40 एकर शेतापासून  पाच किलोमीटर अंतरावर विहीर खोदली. तिला चांगले पाणी लागल्याने तेथून जलवाहिनीद्वारे शेताजवळील विहिरीत पाणी टाकले. पिक कर्ज घेऊन 12 एकर शेतीचे दोन भाग करून प्रत्येकी सहा एकरमध्ये सुमारे एक कोटी रुपये खर्च करून दोन जाळीचे बंदिस्त शेड बनवले. त्यापैकी फक्त सहा एकरच्या शेडमध्ये शिमला मिरची लावली. योग्य निगा, सेंद्रीय खतांचा वापर यामुळे शिमला मिरचीचे मोठे उत्पन्न मिळाले. वर्षभर तेही दररोज ट्रकभर माल सुरतला विकून एक कोटी रुपये मिळाले. त्यात 30 लाख रुपये लागवडसह सर्व खर्च वजा जाता 70 लाख रुपये नफा मिळाला. लवकरच दुसरे शेडमध्येही शिमला मिरची लागवड केली जाणार आहे. एकरी 70 टन मिरची निघेल.

दक्षिणेकडील शेतीत सध्या 14 एकरात पपई लावली असून अंतरपीक म्हणून टरबूज घेतले. व्यापारी शेतात येऊन टरबूज घेऊन गेले. त्याचे 50 लाख रुपये मिळाले. त्यातून 30 लाख रुपये निव्वळ नफा कमावला. अजूनही दररोज ट्रकभर टरबूज बाजारात जात आहेत. याशिवाय  14 एकर मध्ये बोरं आहेच. उत्तरेकडील 30 एकर शेतीत 10 एकर पेरू व 20 एकर शेतीत केळी लावली आहे. सर्व मजूरांवरील पगारावर दररोज सात हजार रुपये खर्च होतो.

आधुनिक तंत्रज्ञान - शिमला मिरचीला लावलेले पाणी अधिक काळ टिकून राहावे, कडक उन्हापासून पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून प्रत्येकी सहा एकरच्या संपूर्ण क्षेत्रावर जाळीदार शेड टाकले असून दरवाजा बसवून बंदिस्त केले आहे. शेडची उंची सुमारे  50 फूट असून तेवढ्या उंचीवरून तुषार सिंचन केले जाते जणू आकाशातून पाऊस पडतोय. याशिवाय विहीरजवळ आधुनिक तंत्रज्ञान वापरून पाण्यासाठी पंप बसविले आहेत. तेथेच फवारणी यंत्र असून मानव रहित पध्दतीने यंत्रांच्या सहाय्याने पिकांना पाणी व फवारणी केली जाते. त्यांना नुकताच धुळ्यात झालेल्या जिल्हा कृषी महोत्सव 2018 अंतर्गत आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. 

गिरासे म्हणतात की, शेती आजही उत्तम असून शेतकऱ्यांनी स्वतः लक्ष दिल्यास व परंपरागत पिकांपेक्षा शेती, पाणी, जमिनीची प्रत, वातावरण पाहून फळबाग लागवड केल्यास भरपूर उत्पन्न मिळते. केवळ योग्य नियोजन व परिश्रम घेतल्यास कोणत्याही शेतकऱ्यास आत्महत्या करावी लागणार  नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com