चांदवडला "एकच फॅक्‍टर, कुंभार्डे डॉक्‍टर'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

चांदवड - चांदवडला जिल्हा परिषदेतील गटांचा व पंचायत समितीच्या गणांचा निकाल तालुक्‍यात राजकीयदृष्ट्या परिवर्तनाची नांदी देणारा ठरला. सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी व सहयोगी पक्षाला सत्तेतून पायउतार करत भाजप- शिवसेनेने बाजी मारली. तालुक्‍यातील दुगाव राष्ट्रवादी, तळेगावरोही भाजप, वडाळीभोई शिवसेना, तर वडनेरभैरव गट कॉंग्रेसच्या ताब्यात राहिला.

चांदवड - चांदवडला जिल्हा परिषदेतील गटांचा व पंचायत समितीच्या गणांचा निकाल तालुक्‍यात राजकीयदृष्ट्या परिवर्तनाची नांदी देणारा ठरला. सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी व सहयोगी पक्षाला सत्तेतून पायउतार करत भाजप- शिवसेनेने बाजी मारली. तालुक्‍यातील दुगाव राष्ट्रवादी, तळेगावरोही भाजप, वडाळीभोई शिवसेना, तर वडनेरभैरव गट कॉंग्रेसच्या ताब्यात राहिला.

तालुक्‍यातील नव्हे, तर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या तळेगाव रोही गटातील प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपच्या डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांचे पुत्र राहुल यांचा 1208 मतांनी पराभव करत गटाबरोबरच वाहेगाव गणात डॉ. नितीन गांगुर्डे व तळेगाव रोही गणात ज्योती आहेर यांची विजयश्री खेचून आणत गटात भाजपची निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली. दुगाव गटात राष्ट्रवादी व भाजप यांच्यात सुरवातीला चुरशीची वाटणारी निवडणूक मात्र सरतेशेवटी एकतर्फी होत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सयाजी गायकवाड यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील शेलार यांचा 4 हजार 978 मतांनी दारुण पराभव केला. दुगाव गणात कॉंग्रेसच्या निर्मला आहेर यांनी भाजपच्या गौरी गांगुर्डे यांचा 2 हजार 7 मतांनी पराभव केला. मेसणखेडे गणात राष्ट्रवादीचे शिवाजी सोनवणे यांनी भाजपचे छगन पवार यांचा 1573 मतांनी पराभव केला. वडाळीभोई गटात मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीच्या लढतीत शिवसेनेच्या कविता धाकराव यांनी राष्ट्रवादीच्या ज्योती धाकराव यांचा 959 मतांनी पराभव केला. वडाळीभोई गणातील लढतीत शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन आहेर यांनी राष्ट्रवादीच्या सुखदेव जाधव यांचा 800 मतांनी पराभव केला. मंगरूळ गणात भाजपच्या पुष्पा धाकराव यांनी कॉंग्रेसच्या जयश्री आहिरे यांचा 163 मतांनी निसटता पराभव केला.

वडनेरभैरव गटात कॉंग्रेसच्या शोभा कडाळे यांनी शिवसेनेच्या अलका गांगुर्डे यांचा एक हजार 230 मतांनी पराभव केला. गणातील लढत प्रचारादरम्यान जरी चुरशीची वाटत असली, तरी निकाल आल्यानंतर गणात माजी आमदार भालेराव यांचे पुत्र अमोल यांनी अपक्ष उमेदवार अनिल कोठुळे यांचा 2 हजार 928 मतांनी पराभव केला. येथे भाजप-शिवसेनेचे उमेदवार तिसऱ्या व चौथ्या स्थानावर फेकले गेले. धोडंबे गणात शिवसेनेच्या ज्योती भवर यांनी कॉंग्रेसच्या ऊर्मिला उशीर यांचा 80 मतांनी निसटता पराभव केला. तालुक्‍यातील गट-गणाचा निकाल बघता तालुक्‍यात सर्वांत मोठा पक्ष भाजप राहिला. मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी भीमराव दराडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी शरद मंडलिक यांनी चोख कामगिरी बजावली.

Web Title: One factor in Chandwad; Kumbharde Doctor