हमालीच्या वादातून भाच्याचा केला खून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

नाशिक - पंचवटीतील पेठरोडवर तेलंगवाडीत बुधवारी (ता.13) सकाळी 9 वाजेच्या सुमारास महिलेसह सहा जणांनी 25 वर्षीय भाच्यावर लोखंडी रॉड, चाकू, चॉपरने हल्ला चढविला. यात धारदार चाकू-चॉपरचा वर्मी घाव बसल्याने अनिल सुखलाल गुंजाळ (25, रा. वैशालीनगर, पेठरोड, पंचवटी) याचा जागीच मृत्यु झाला. तर त्याचा जोडीदार गंभीर जखमी असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीसांनी सहा जणांना अटक केली असून, खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

जयराम नामदेव गायकवाड (44), सुरज जयराम गायकवाड (18), श्रीराम नामदेव गायकवाड (36), दशरथ नामदेव गायकवाड (24), ऋतिक जयराम गायकवाड (20), अंबिका अर्जून पवार (सर्व रा.लक्ष्मणनगर, पेठरोड, पंचवटी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पंचवटी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल गुंजाळ हा जयराम गायकवाड यांचा भाचा असून हे सारे मार्केट यार्डात हमालीचे काम करतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या अंतर्गत वाद सुरू होता. त्यातच मंगळवारी (ता.12) रात्री माल लोड करण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्या वादातूनच रात्रीच पंचवटी पोलीसात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या होत्या. 

अनिल गुंजाळ आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास तेलंगवाडीतील लक्ष्मणनगरमधून जात असताना, संशयित महिला अंबिका पवार हिने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि त्याचवेळी जयराम गायकवाडसह पाचही जणांनी त्याच्यावर चॉपर, चाकू, लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण सुरू केली. यात चाकू आणि चॉपरचा वर्मी घाव बसल्याने तो जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेची माहिती कळताच उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत अनिलला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. 

दरम्यान, संशयितांची ओळख पटवून त्यांना अवघ्या तासाभरात पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: one murdered in a nashik