राज्यात कैद्यांना मुक्त विद्यापीठातर्फे मोफत शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

कुलगुरू ई. वायुनंदन - पदविका, पदवीसह पदव्युत्तर पदवीचा समावेश

कुलगुरू ई. वायुनंदन - पदविका, पदवीसह पदव्युत्तर पदवीचा समावेश
नाशिक - कैद्यांची गुन्हेगारी मानसिकता बदलून त्यांना पुन्हा समाजात एक चांगला नागरिक म्हणून जगता यावे, यासाठी राज्यातील सर्व कारागृहांमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे मोफत शिक्षण दिले जाईल. त्यामध्ये पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमाचा समावेश राहील, असे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी सांगितले.

मुंबई, ठाणे, तळोजा, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती इथे मध्यवर्ती कारागृहे आहेत. तेथील वीस हजारांहून अधिक बंदिजनांना विद्यापीठाच्या मोफत शिक्षणाच्या निर्णयाचा फायदा होणार आहे. दरम्यान, मुक्त विद्यापीठ आणि योग विज्ञान प्रबोधिनीतर्फे नाशिक मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी योग शिक्षक प्रशिक्षण वर्ग वर्षभर चालला. एक वर्षाच्या योग पदविका प्रशिक्षण वर्गाचा पारितोषिक वितरण कार्यक्रम नुकताच झाला. या वेळी डॉ. वायुनंदन बोलत होते. प्रशिक्षणार्थी साधकांनी योगाच्या विविध प्रकारच्या आसनांची प्रात्यक्षिके सादर केली, त्यास उपस्थितांनी दाद दिली.

योगामुळे नकारात्मक विचार झाले कमी
नायजेरियाच्या कैद्याने प्रशिक्षणाविषयी सांगितले. तो म्हणाला, की मी येथे आलो, तेव्हा माझ्या मनात खूप तिरस्कार होता. येथे योग शिक्षक प्रशिक्षणात सहभाग घेतल्यानंतर माझ्यात खूपच बदल झाल्याचे मला अनुभवायला मिळाले. माझ्या चिडखोर स्वभावात बदल झाला असून, अंतर्मनातदेखील बदल झाला आहे. आता मी प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक भावनेतून विचार करायला लागलोय. याशिवाय मनाची एकाग्रता आणि शरीराची कार्यक्षमता वाढण्यासाठी बळ मिळतेय. इथून बाहेर पडल्यानंतर योग साधक म्हणून प्रचारक व्हायला आवडेल.