पैठणीच्या टोपीचा तोराही कोटींचा ; येवल्याच्या टोपीला राज्यभरातून साद

TOPI
TOPI

येवला : डोक्यात दिसणारी कडक टोपी घातली कि कितीही साध व्यक्तीमत्व असले तरी त्या व्यक्तीचा रुबाब उठुन दिसतो. ही चंदू असो की टेरिकॉटची टोपी पण तीचा तोरा मात्र काही औरच. ही रुबाब वाढवणारी टोपी बनते ती पैठणीच्या गावात. सुमारे हजारावर कुटुंबाचा आधार बनलेली ही टोपी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन येवल्याचे उत्पन्न वर्षाला १३ ते १५ कोटींची भर घालत आहे.

पुढारी, बागायतदार, शेठजी एवढेच नव्हे तर शेतमजूर, कामगार आणि गावातील प्रत्येक पुरुषाच्या डोक्यावर दिसणारी पांढरी शुभ्र टोपी हे आपल्या संस्कृतीची ओळख आहे. निवडणूकीत कार्यकर्ता अन लग्नसमारंभात सगेसोयरे व वऱ्हाडींची हि टोपी ओळख बनलीय. संस्कृतीचा धागा म्हणून आधुनिकता आली तरी या टोपीचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही म्हणूनच व्यापारी पेठ असलेल्या गावाची ओळख तशी पैठणी म्हणूनच सर्वदूर असली तरी टोपीने अर्थकारणाला आकार देत नावलौकिक वाढवला आहे. मंचर, धुळयाप्रमाणेच येथील टोपीची खासियत आहे. येथे भगवान, चंदू व खादी टोपी बनतेच पण खास करून मिनिस्टर टेरीकॉटच्या पांढरी स्वच्छ, भगवा रंगाच्या टोपीचे उत्पादन अधिक आहे. हलकी, भारी या प्रकारानुसार ३ रुपये ते २५ रुपयापर्यंतची टोपी येथे तयार होते. तर यासाठी हजारवर हात राबत असून हक्काचा रोजगार त्यांना मिळाला आहे.

येथील टोपीला मुंबई, नासिक, नगर, धुळे, औरंगाबाद, नागपूर, बीड, पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मागणी असून सहा महिने तेजी तर सहा महिने मंदी असणारा हा लघुउद्योग असला तरी वर्षभर कामकाज सुरु असते.  इचलकरंजी, सुरत, अहमदाबाद, बलोत्रा (राजस्थान) येथून यासाठीचा कपडा मिळतो. याचे कटिंग करून महिला कपडा आपल्या घरी आणून टोपी शिवण्याचे काम मशीनवर करतात. तर इतर सदस्य इस्त्री करून १० टोप्यांचे पॅकिंग बनवतात. आता कटिंग व शिलाई मशीनने मजुरांचे काम सोपे होत आहे.

  • असा आहे चंदू टोपीचा इतिहास

टोपीचे मूळ नाव गांधी टोपी पण काळाच्या ओघात तिला अनेक नावे मिळत गेल. चंदू टोपी म्हणजेच मिनिस्टर टोपी असे एक लोकप्रिय नाव तिला मिळाले. धुळे येथील परंतू येवल्यात नातेवाईक असलेला कारागीर चंद्रकांत बिरड याने तयार केलेल्या टोपीला चंदू टोपी नाव दिले. हेच नाव पुढे कडकडीत असलेल्या टोपीला मिळाले अशी आठवण या टोपीच्या बाबतीत येथील माजी आमदार मारोतराव पवार यांनी सांगितली. आता तर मंचर, धुळे किंवा येवला यांपैकी कुठलीही टोपी असली तरी तिला चंदू टोपी म्हटले जाते.

  • प्रसिध्द ‘टोपी’ वाले

विनोद कॅप
दिनेश कॅप
चेतन कॅप
गणेश कॅप
प्रवीण कॅप
संजय कॅप

  • टोपीचे आकडे बोलतात

एकूण घाऊक व्यापारी - १२
तयार करण्याच्या मजुरीचे दर - २० रुपये डझन
एक टोपीतून मिळालेले उत्पन्न - दीड ते पावणेदोन
महिलांना मिळणारे उत्पन्न - घर सांभाळून १५० ते २०० रुपये
टोपी शिवण्याचा हाताना काम - सुमारे एक हजार
एका कारखान्यातील कामगार - सुमारे २० ते २५
महिन्याला सरासरी उलाढाल - १ कोटीपर्यंत 

“टोपीसारखा लघुउद्योग सुरू करूनही तिला महाराष्ट्रभरातून असलेल्या मागणीमुळे हा माझा मुख्य व्यवसाय झाला आहे. अनेक घरांसह गरिबांना व महिलांना या व्यवसायाने आर्थिक आधार दिला असून धुळे व मंचरच्या बरोबरीनेच राज्यात येवल्याच्या टोपीला ही बाजारात क्रेज आहे.”
-विनोद वाघमारे, टोपी उद्योजक, येवला     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com